पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग

नगरपालिकेसमोरील पोलीस कॉलनीतील थरार

by Team Satara Today | published on : 05 October 2024


सातारा : सातारा शहरातील कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासंदर्भात आरोग्य विभागाचा सुरू असलेला हेळसांडपणा शनिवारी एका मुक्या प्राण्याच्या जीवावर बेतला. पोलीस कॉलनीत एका इतस्त भटकणार्‍या बैलाला पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे त्याला रेबीजचा संसर्ग झाला. त्यामुळे त्या बैलाने पोलीस कॉलनीमध्ये धुमाकूळ घालत नागरिकांना त्रस्त करून सोडले होते. सातार्‍यातील एका प्राणीमित्र संघटनेने तातडीने बैल पकडून त्याला सुरक्षित स्थळी हलवले. सातारा पालिकेने सुद्धा भटके कुत्रे पकडून सातार्‍याबाहेर सोडून दिल्याचे सांगितले.

सातारा शहरांमध्ये जवळपास तीन हजाराहून अधिक भटकी कुत्री असूनही सातारा पालिका त्यांच्या जन्मदर नियंत्रण प्रकरणांमध्ये प्रचंड हेळसांडपणा करत आहे. कुत्र्यांचा जन्मदर नियंत्रण कार्यक्रम सातारा पालिकेला बंधनकारक आहे. सातारा पालिकेने याची निविदा देऊन आपली बाजू सावरून घेतली. मात्र संबंधित संस्थेने अद्यापही म्हणावे तसे काम केलेले नाही. काही दिवसांपूर्वी सातारा पालिकेने एका रात्रीत 25 कुत्री पकडल्याचा दावा केला होता. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस कॉलनी मध्ये एका भटक्या बैलाला पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे रेबीज चा संसर्ग झाला. ही बाब लक्षात आल्याने काही सतर्क नागरिकांनी या बैलाला अत्यंत हुशारीने दोरीने एका ठिकाणी बांधून ठेवले. मात्र रेबीज संसर्ग वाढल्याने बैलाने असह्य होऊन इकडून तिकडे धावायला सुरुवात केली. त्यामुळे पोलीस कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या संदर्भात युवा मित्र संघटनेचे अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी याबाबत पुन्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. नागरिकांनी सातारा पालिकेचे आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांना प्राचारण केले. एका प्राणी मित्र संघटनेने त्या बैलाला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन या परिसरातील धोका टाळला व सातारा पालिकेने सुद्धा पिसाळलेले कुत्रे पकडून दूरवर कुठेतरी सोडून दिल्याचे सांगितले. संबंधित प्राणी मित्र संघटनेला सातारा नगरपालिकेने ना हरकत दाखला देणे आवश्यक असते. मात्र त्या संदर्भात आपण कोणताही दाखला दिला नसल्याचे राठोड यांनी सांगितले. पिसाळलेले कुत्रे कसे व कोणी पकडले, याबाबतही आरोग्य निरीक्षक काहीही खुलासा करू शकले नाहीत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच
पुढील बातमी
अवैध फटाका विक्री करणार्‍या दोघांवर गुन्हा

संबंधित बातम्या