सातारा : सातारा जिल्ह्यातील एस. पी. लोटस टेक सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या स्थानिक कंपनीने विकसित केलेली डिजिटल नेम प्लेट ही संकल्पना आता सातारा जिल्ह्यातून राज्यस्तरावर पोहोचली आहे. ग्रामपंचायत क्षेत्राची डिजिटल परिवर्तनाकडे वाटचाल करणारी ही संकल्पना असून नागरिकांना क्यू आर कोड स्कॅन करून थेट त्यांची मालमत्ता माहिती, चालू कर भरणा, थकीत कर भरणा, पावती डाऊनलोड व अॅपद्वारे ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती कंपनीचे डिरेक्टर अँड सीईओ प्रशांत यादव, डिरेक्टर वीपी सेल्स सागर साळुंखे यांनी दिली.
एस. पी. लोटस टेक सॉफ्टवेअर प्रा. लि. ही पूर्णपणे सातारा जिल्ह्यात कार्यरत असणारी कंपनी असून, त्यांनी ग्रामपंचायतींसाठी नमुना 1 ते 33 यासह संपूर्ण डिजिटल ग्राम सॉफ्ट विकसित केले आहे. त्याच्या उपयुक्ततेबाबत पुणे जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत, डिजिटल नेमप्लेटचे डेमो सेशनचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व ही संकल्पना ग्रामपंचायत कर वसुली प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असे मत मांडले.
त्याचबरोबर कर वसुलीमधील पारदर्शकता आणि वेळेची बचत या दोन्ही बाबतीत डिजिटल नेमप्लेट महत्त्वाचं पाऊल ठरेल, तसेच नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई व बाहेर कुठेही एवढेच नव्हे, तर परदेशात असणार्यांना गावाकडचा कर भरण सोप जाणार आहे. त्यामुळे ही संकल्पना ग्रामपंचायतींसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहेत. तसेच ना. अजित पवार यांनी आता ही संकल्पना राज्यभर राबविण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. कंपनीचे डिरेक्टर अँड सीईओ प्रशांत यादव, डिरेक्टर अँड वीपी सेल्स सागर साळुंखे व त्यांची टीम यांनी ही संकल्पना विविध ग्रामपंचायतींमध्ये यशस्वीपणे राबविण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
ग्रामपंचायतीने घरपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल तसेच इतर स्थानिक करांची वसुली अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी क्यू आर कोड प्रणाली सुरू केली आहे. प्रत्येक घर मालकाला त्याच्या कराच्या माहितीचा समावेश असलेला क्यू आर कोड स्कॅन केल्यावर संबंधित कराची माहिती आणि ऑनलाईन पेमेंटची लिंक उघडते. ज्याद्वारे नागरिक थेट मोबाईलवरूनच पैसे भरता येऊ शकतात. ग्रामपंचायतीत या डिजिटल सुविधेमुळे नागरिकांना वेळ वाचणार असून त्यांना कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही.