शाहूनगर, गोळीबार, गोडोली परिसरातील पाणीप्रश्न तातडीने सोडवा

ना. शिवेंद्रसिंहराजे; महावितरण, एमजेपीच्या अधिकाऱ्यांना केल्या सक्त सूचना

by Team Satara Today | published on : 28 October 2025


सातारा :  शाहूनगर, गोळीबार मैदानसह गोडोलीच्या काही भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई होत आहे. येथील नागरिकांच्या अनेक तक्रारी असून या भागातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत झाला पाहिजे. महावितरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने तोडगा काढून  शाहूनगर, गोळीबार, गोडोली परिसरातील पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशा सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या. 

शाहूनगर, गोळीबार मैदानसह गोडोली परिसरातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई होत आहे. याबाबत येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनी आणि एमजेपीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही तोगडा निघाला नाही. दोन्ही विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करत असल्याने अखेर येथील नागरिकांनी आज ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली. ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी तातडीने वीज वितरण कंपनी आणि एमजेपीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीला महावितरणचे अभियंता नवाळे, सुतार, एमजेपीच्या गडकरी मॅडम, देशमुख आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक शेखर मोरे- पाटील, फिरोज पठाण, अमित महिपाल, प्रकाश घुले, सुशांत महाजन, अतुल घुले, निखिल माळी, अमोल नलावडे, नीतीराज सूर्यवंशी, पप्पू घोरपडे, संजय धोंडवड, प्रथमेश मोहिते, सचिन तिरोडकर, रवी पवार, बाळासाहेब महामूलकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.  ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या. नागरिकांच्या मागणीनुसार चारभिंती येथील ४ लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी चालू करून या भागामध्ये पाणीपुरवठा सुरु करा, तसेच एमजेपीसाठी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवण्याच्या सूचना ना. शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार येत्या २० दिवसात चारभिंती येथील नवीन पाण्याची टाकी चालू केली जाईल, असे एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. २०० के व्ही चा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा शब्द वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याप्रसंगी दिला. यामध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नसल्याची ताकीद ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबर पर्यंत मुदत ; पदवीधरांनी व शिक्षकांनी त्वरित नोंदणी करावी : जिल्हाधिकारी
पुढील बातमी
पावसाळी पर्यटन स्थळांवर हवा पोलिसांचा 'वॉच'

संबंधित बातम्या