कराड : स्वातंत्र्यपूर्वकाळातील समाजसुधारकांनी मोठ्या अडचणींना तोंड देत समाजप्रबोधनाचे कार्य केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासह सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांची उजळणी आणि जपणूक करणं ही काळाची गरज आहे. पुण्यात आगरकर यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने उभारले जावे, अशी अपेक्षा कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेशबाबा भोसले यांनी व्यक्त केली.
कराड येथील इंद्रधनु विचारमंच फाउंडेशन व सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या वतीने सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६९ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंतराव जाधव यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी दैनिक मुक्तागिरीचे संपादक अनिल देसाई, प्रेरणादायी व्याख्याते प्रा. डॉ. विनोद बाबर, ज्येष्ठ पत्रकार हणमंतराव मोहिते, दै. तरूण भारत उपसंपादक गौरी आवळे, प्रसिध्द सुलेखनकार डॉ. संदीप डाकवे यांना सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पत्रकारितेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आयटी सेल प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, टेंभू गावच्या सरपंच सौ. रुपाली भोईटे, उपसरपंच शिवाजी साळुंखे, माजी सरपंच युवराज भोईटे, इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त प्रमोद तोडकर, संदीप चेणगे, अशोक मोहने माणिक डोंगरे, नितीन ढापरे, विकास भोसले यांची व्यासपीठावर उपस्थित होती.
यावेळी बोलताना सारंगबाबा पाटील यांनी सांगितले की, “सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांचे विचार आणि कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणे ही आजची गरज आहे. पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर प्रामाणिकपणे करत समाजहिताचा विचार करावा. आगरकरांच्या विचारांनी प्रेरित पत्रकारिता हीच खरी समाजप्रबोधनाची दिशा आहे.”
रामकृष्ण वेताळ यांनी यावेळी सांगितले की, “टेंभू गावचे सुपुत्र गोपाळ गणेश आगरकर यांचे स्मारक कराड तालुक्यात व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गेल्या पाच वर्षांपासून इंद्रधनु विचार मंचने सुरू केलेले उपक्रम राज्यभर कौतुकास्पद ठरत आहेत. या कार्यात शासनाचेही योगदान मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे.”
यावेळी पुरस्काराला उत्तर देताना संपादक अनिल देसाई म्हणाले, समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीशी राहण्याची गरज असून हे काम इंद्रधनु विचार मंच फाउंडेशन करीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेला लढा हा देशाला प्रेरणादायी ठरला आहे. तसेच दुष्काळी भागाला सुजलाम सुफलाम करणाऱ्या टेंभू योजनेला सुधारककार गोपाळ गणेश आगरकर याचे नाव द्यावे असेही ते म्हणाले.
यावेळी प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, हणमंतराव मोहिते, प्रा. डॉ. विनोद बाबर, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंद्रधनु फौंडेशनचे विश्वस्त संदीप चेणगे यांनी केले तर आभार विश्वस्त अशोक मोहने यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा. कोमल कुंदप यांनी केले. कार्यक्रमास कराड तालुक्यातील विविध दैनिकांचे कार्यालय प्रमुख, उपसंपादक, पत्रकार, साहित्यिक, विद्याथ, विद्यार्थिनी व नागरिकांची उपस्थिती होती.
‘इंद्रधनु’ चे मान्यवरांनी केले कौतुक
सुधाकर गोपाळ गणेश आगरकर यांचे मूळ गाव कराड तालुक्यातील टेंभू असून राज्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अनेकांना याबाबत माहीत नाही. मात्र इंद्रधनु विचार मंच फाउंडेशन या संस्थेने गेल्या चार वर्षापासून आगरकरांचे विचार राज्यभर रुजविण्यास सुरुवात केली आहे. तसेच राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारामुळे गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या महान व्यक्ती चे कार्य समाजापुढे येत आहे. याबाबत डॉ. सुरेश भोसले, सारंग पाटील, प्राचार्य मोहन राजमाने व इतर मान्यवरांनी कौतुक केले.