सातारा : शिवकालीन गडकोट हे मराठ्यांच्या ज्वलंत इतिहासाचे साक्षीदार असून मराठी अस्मिता व राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहेत. अशा ऐतिहासिक ठेव्याचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी आजच्या तरुणाईवर आहे, असे प्रतिपादन दुर्ग अभ्यासक व प्राध्यापक प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी केले.
कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे अजिंक्यतारा किल्ल्यावर आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात ‘गडकिल्ले आणि आपली जबाबदारी’ या विषयावर ते बोलत होते.
प्रा. अदाटे यांनी छत्रपती शिवरायांनी गडकोटांचे सामरिक व प्रशासकीय महत्त्व ओळखून किल्ल्यांची उभारणी व डागडुजी केल्याचे सांगितले. गडांवरील प्रवेशद्वारे, जंग्या, देवड्या, पाण्याची टाके, बुरुंज, बालेकिल्ला, अंबरखाना, राजसदर यांसारख्या रचनांची माहिती विद्यार्थ्यांनी समजून घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले. आज अनेक गडांवरील अवशेष काळाच्या ओघात नष्ट होत असून स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन व संवर्धन उपक्रमांत युवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. गौतम काटकर यांनी गडभ्रमंतीमुळे इतिहास व भूगोलाचे ज्ञान वाढते, तसेच शारीरिक व मानसिक आरोग्यासही लाभ होतो, असे नमूद केले. कार्यक्रमास प्राध्यापकवर्ग व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.