सातारा : सीमेवर शत्रूच्या गोळ्या झेलताना ज्यांचे मन डगमगत नाही, अशा आपल्या बहाद्दर जवानांचा गावाकडे सुट्टीवर आल्यावर रस्ते अपघातात हकनाक बळी जाणे, हे देशाचे आणि समाजाचे मोठे दुर्दैव आहे. गेल्या काही दिवसांत सातारा जिल्ह्यात सुट्टीवर आलेल्या जवानांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढले आहे. साताऱ्यात नुकत्याच घडलेल्या एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने तर संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे आता "सैनिकांनो, देशाला तुमची गरज आहे, सुट्टीवर आल्यावर दुचाकी जपून चालवा," असे कळकळीचे आवाहन करण्याची वेळ आली आहे.
परवा साताऱ्यातील भिक्षेकरी गृहासमोर घडलेल्या अपघातात भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद जाधव (रा. दरे, पो. आरे, ता. सातारा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इतकी चटका लावणारी आहे की, ऐकणाऱ्याचेही मन हेलावून जावे. प्रमोद जाधव हे आपल्या गरोदर पत्नीच्या बाळंतपणासाठी सुट्टीवर गावी आले होते. इकडे रुग्णालयात पत्नीने गोंडस बाळाला जन्म दिला, सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र, आपल्या नवजात बाळाचे मुख पाहण्यापूर्वीच काळाने जाधव यांच्यावर घाला घातला. या अपघातात त्यांचे निधन झाले आणि एका क्षणार्धात त्या कुटुंबाचा आनंद दुःखाच्या सागरात बुडाला. भारतीय सैन्य दल एका उमद्या जवानाला मुकले असून, या कुटुंबाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
सध्या जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. मात्र, हा हंगाम सर्वसामान्यांच्या जिवावर उठला आहे की काय, असा प्रश्न पडतो. रस्त्यावर धावणारे ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर म्हणजे जणू यमदूतच बनले आहेत. एका ट्रॅक्टरला दोन-दोन, तीन-तीन ट्रॉल्या जोडून धोकादायक वाहतूक सुरू आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्या या वाहतूकदारांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस आणि आरटीओ विभाग 'साखर सम्राटां'समोर शेपटी घालत असल्याचे चित्र आहे. या अवजड आणि बेकायदेशीर वाहतुकीमुळे राज्यभरात शेकडो निष्पापांचे बळी जात आहेत, तरीही यंत्रणा जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे, ही चीड आणणारी बाब आहे.
लष्करात कार्यरत असताना जवान अनेक महिने सीमेवर किंवा फिल्डवर असतात. तिथे त्यांना दुचाकी चालवण्याचा संपर्क नसतो. सुट्टीवर आल्यावर अचानक दुचाकी हातात घेतल्यावर सराव नसल्याने किंवा वाढलेल्या ट्रॅफिकचा अंदाज न आल्याने अपघात घडतात. त्यातच रस्त्यांची अवस्था आणि बेशिस्त वाहतूक यामुळे धोका वाढतो.भारतीय लष्करातील जवानांनी आपली काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सुट्टीवर आल्यावर थेट उत्साहाच्या भरात दुचाकी किंवा चारचाकी वेगात चालवणे टाळावे. शक्यतो स्थानिक मित्र, भाऊ किंवा ज्याला रोजच्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवण्याचा अनुभव आहे. यांना बरोबर घेऊन प्रवास करावा. जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टाळता येतील.