सातारमध्ये वळीवाचा जोरदार पाऊस

फलटण तालुक्यात वीज पडून गाय ठार

by Team Satara Today | published on : 16 May 2025


सातारा : ढगांच्या गडगडाटात वळवाच्या पावसाने साताऱ्यासह तालुक्यात शुक्रवारी सकाळी एक तासभर जोरदार हजेरी लावली. यामुळे सखल भागात पाणी साचले. दरम्यान, सातारा तालुक्यातील वर्ये, लिंबखिंड परिसरात चांगला पाऊस झाला. तर फलटण तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली. एके ठिकाणी नाराळाच्या झाडाने पेट घेतला. तर कापडगावला वीज पडल्याने गाय जागीच ठार झाली.

जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. तापमानातही मोठ्या प्रमाणात उतार आला आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरण तयार होत होते. त्यातच जिल्ह्यातील काही भागात पाऊसही झाला. पण, शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात आभाळ भरुन आले होते. यामुळे काही भागात पाऊस पडला. सातारा शहरासह तालुक्यात तर सकाळी ११ पासूनच पावसाचे थेंब पडू लागले. त्यानंतर साडे आकरा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या गडगडाटात पाऊस पडत होता. अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. तरीही रिपरिप सुरूच होती. त्यामुळे दुपारी पाऊस एकदम कमी होत गेला. या पावसामुळे सातारा शहरातील सखल भागात पाणी साचले. त्यामुळे दुकानमालकांची तारांबळ उडाली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण येथे रामराजेंची वडूज पोलिसांकडून चौकशी
पुढील बातमी
सज्जनगडाच्या बुरुजावर कायमस्वरूपी फडकणार भगवा ध्वज !

संबंधित बातम्या