कराडला 26 ते 30 डिसेंबर कृषी प्रदर्शन; पीक, पशुपक्षी, श्वान स्पर्धा; ‘एआय’ तंत्रज्ञानाचे आकर्षण

by Team Satara Today | published on : 10 December 2025


कराड :  कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन दि. 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या प्रदर्शनात यंदा एआय तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसारावर भर देण्यात येणार आहे. हे कृषी प्रदर्शन भव्य स्वरूपात होण्यासाठी बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक प्रयत्नशील असल्याची माहिती सभापती शंकरराव उर्फ सतीश इंगवले आणि उपसभापती नितीन ढापरे यांनी दिली.

कराड बाजार समितीच्या सभागृहात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संचालक प्रकाश पाटील, विजयकुमार कदम, संभाजी काकडे, गणपत पाटील, राजेंद्र चव्हाण, सर्जेराव गुरव, मनुभाई पटेल, जे. बी. लावंड, सचिव आबासाहेब पाटील उपस्थित होते.

हे कृषी प्रदर्शन दरवर्षी दि. 24 ते दि. 28 नोहेंबर या कालावधीत आयोजित केले जाते. मात्र, यंदा या कालावधीत पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. त्यामुळे हे कृषी प्रदर्शन आता दि. 26 ते 30 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दरवर्षीप्रमाणे फळे, फुले, भाजीपाला, ऊस, गाय, बैल, म्हैस, शेळी, मेंढी आदी पशुपक्षी आणि श्वान प्रदर्शन आणि स्पर्धा होणार आहेत. शेतकरी आणि बचत गटांना शंभर स्टॉल मोफत देण्यात येणार आहेत. यावर्षीच्या प्रदर्शनात एआय तंत्रज्ञान हे मुख्य आकर्षण असेल. शेतकर्‍यांना एआय तंत्रज्ञानाची माहिती व्हावी. शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती साधावी, यासाठी प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात एआय तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काळाजी गरज ओळखून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडावा, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात पीक व भाजीपाला उत्पादकांना पुरस्कार देण्यात येतात. कराडची गूळ उत्पादक म्हणून ओळख आहे. त्यामुळे यावर्षीपासून उत्कृष्ट गूळ उत्पादक शेतकर्‍यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी 12 शेतकर्‍यांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सतीश इंगवले व नितीन ढापरे यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एमआयडीसीतून मंदार ट्रेडर्समधील कपाटात ठेवलेली साडेतीन लाखांची रोकड चोरीस
पुढील बातमी
कोरेगावातील बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा; राहुल बर्गे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची मागणी

संबंधित बातम्या