सातारा : सैदापूर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. त्यात १९ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन लाखांच्या सहा दुचाकींसह ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदापूर परिसरात तीन पानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती ओगलेवाडी दूरक्षेत्राच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्याची खात्री केली. पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक माळी व त्यांच्या ओगलेवाडी दूरक्षेत्राच्या पोलिस पथकाने त्या अड्ड्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास छापा टाकला. त्या वेळी तेथे अवैधरीत्या तीन पानी जुगार सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित तेथे जुगार खेळणाऱ्या १९ जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून जुगारातील रोख ३० हजारांची रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे. त्यांच्याकडील सुमारे दोन लाखांच्या सहा दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याची फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.