कोरेगाव तालुक्यात पाच उमेदवारांची माघार; . शिवसेना–भाजप महायुतीच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे

by Team Satara Today | published on : 25 January 2026


कोरेगाव  : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कोरेगाव तालुक्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत असून, उमेदवारी अर्ज माघार प्रक्रियेमुळे निवडणूक चित्र अधिकच उत्सुकतेचे बनले आहे. शिवसेना–भाजप महायुतीच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट होत असतानाच, शनिवारी पाच उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.

शनिवारअखेर जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी ४८ तर पंचायत समितीच्या बारा जागांसाठी ८१ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत गतिमान कार्यक्रम जाहीर केल्याने सर्वच राजकीय पक्षांची रणनीती आखण्यात मोठी धावपळ सुरू आहे. यंदा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाल्याने माघार प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी वाठार किरोली जिल्हा परिषद गटातून भाजपच्या अनिता विकास गायकवाड यांनी उमेदवारी माघारी घेतली. आर्वी पंचायत समिती गणातून भाजपचे दत्तात्रय शंकर यादव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश संपत जाधव आणि अधिक ज्ञानदेव पवार यांनी अर्ज माघारी घेतले. ल्हासुर्णे पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या रूमा विक्रम चव्हाण यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली आहे.

या निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत अद्याप शिल्लक असल्याने, अंतिम लढतीचे स्पष्ट चित्र माघार प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशीच समोर येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनाने भक्तीचा महासंगम; हिंद-दी-चादर समागमात श्री गुरु ग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांची महासागरासारखी गर्दी
पुढील बातमी
बांधकाम विभागाच्या अतिक्रमणाविरोधात आत्मदहनाचा इशारा; रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांचे निवेदन

संबंधित बातम्या