कामराच्या प्रेक्षकांनाही नोटीसा !

अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणंही गुन्हा?

by Team Satara Today | published on : 02 April 2025


मुंबई  : कॉमेडियन कुणाल कामरा सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मुंबई पोलीस कुणाल कामराचा शोध घेत असून त्याला नुकतीच तिसरं समन्स बजावण्यात आलं आहे. दरम्यान दुसरीकडे, कुणालला मद्रास न्यायालयाने अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. मात्र आता कुणाल कामराच्या या शोला उपस्थित राहणारे प्रेक्षकही कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. आता प्रेक्षकांनाच थेट जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आल्याने खरोखरच अशा कार्यक्रमांमधून वाद झाल्यानंतर हे कार्यक्रम पाहायला जाणारेही प्रेक्षकही आरोपींच्या कचाट्यात उभं केलं जाणं किती योग्य आहे? असा सवाल विचारला जात आहे. यासंदर्भात कायदा काय सांगतो ते पाहूयात...

खार पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोनदा समन्स बजावले. दोन वेळा समन्स बजावूनही कुणाल कामरा खार पोलीस ठाण्यात हजर झालेला नसल्याने त्याला तिसरं समन्सही बजावण्यात आलं आहे. कुणाल कामराने 2 फेब्रुवारी रोजी मुंबईतील ‘युनिकॉन्टिनेंटल’ हॉटेलमधील ‘द हॅबिटॅट’ या स्टुडिओमध्ये ‘नया भारत’ हा स्टॅण्ड अप कॉमेडी शोचं सादरीकरण केलं होतं. याच शोमध्ये त्याने एका गाजलेल्या गाण्याच्या चालीवर एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक कविता सादर केली होती. या शोमध्ये जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांना देखील आता मुंबई पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस या शोमध्ये हजर राहिलेल्या प्रेक्षकांचे जबाब नोंदवणार असून काही प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम 179 अंतर्गत मुंबई पोलिसांनी प्रेक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत. या कलमांतर्गत पोलिसांना प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे. मात्र आता प्रेक्षकांना नोटीस आल्याने अशा कार्यक्रमांना जाणं सुद्धा गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांना अशाप्रकारे प्रेक्षकांची चौकशी करण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्नही विचारला जात आहे.

याचसंदर्भात 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना माजी आयपीएस अधिकारी व वकील वाय. पी. सिंह यांनी आपलं मत नोंदवलं आहे. "पोलिसांना या शोमधील एक ते दोन प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे. मात्र, या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असल्याने प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याची आवश्यकता नाही," असं सिंह यांनी सांगितलं आहे. अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणं हा गुन्हा नसून पोलीस सामान्य चौकशीसाठी अशावेळी प्रेक्षकांना नोटीस पाठवू शकतात.

दोनदा समन्स बजावूनही कुणाल कामरा चौकशीसाठी हजर न झाल्याने खार पोलिसांनी त्याच्या वडिलांची चौकशी केली. मुंबईतील माहिम येथील कुणाल कामराच्या वडिलांच्या घरी जाऊन खार पोलिसांनी त्याच्या पालकांकडे त्याच्यासंदर्भात चौकशी केली. कुणालशी संपर्क झाला आहे का? तो मुंबईत येणार आहे का? चौकशीसाठी हजर होणार आहे का? असे प्रश्न पोलिसांनी कुणालच्या आई-वडिलांना विचारल्याची माहिती समोर येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
समाजोपयोगी कार्य करणारे अजातशत्रू असतात : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.युवराज कर्पे
पुढील बातमी
उन्हाळ्यात ताक पिणे शरीरासाठी फायदेशीर

संबंधित बातम्या