सातारा : राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींचा दौरा श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने यावर्षी अकोला, बुलढाणा, नागपूर येथे यशस्वीपणे गेली दोन महिने पूर्ण करण्यात आला. त्यानंतर या पादुका समर्थ भक्तांसोबत पुणे मार्गे येत्या शुक्रवार दि. 31 जानेवारी 2025 रोजी पादुका सायंकाळी पाच वाजता सातारा येथे येत आहेत. शिवसमर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शाहुनगरीत यंदाही श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचे प्रचार दौरा करुन आगमन होत आहे.
श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड व श्री समर्थ रामदास स्वामी भक्त मंडळ सातारा यांचे वतीने शिवतीर्थ, पोवई नाका येथे या समर्थ पादुकांचे स्वागत व आगमन सोहळा अनेक क्षेत्रातील मान्यवर, शिवसमर्थ भक्त व वारकरी संप्रदायांच्या उपस्थितीत होत आहे. त्यानंतर विविध शाळांच्या चित्ररथा समावेत तसेच पारंपारिक वेशातील शालेय मुला-मुलींच्या वारकरी दिंडी सोबत ही मिरवणूक पोवई नाका येथून सुरू होऊन मल्हार पेठ, शेटे चौक, कमानी हौद, देवी चौक मार्गे मोती चौकात येऊन त्यानंतर गांधी मैदान राजवाडा येथे येणार आहे.
गांधी मैदानावर भव्य उभारून या ठिकाणी समर्थ पादुका सातारकरांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच या मिरवणूक व पादुका आगमन सोहळ्यानिमित्त गांधी मैदान येथे सायंकाळी पाच ते सहा या वेळेत महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा चे मल्लखांबपटू मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत श्रीराम गुणगान हा सातारा परिसरातील सुप्रसिद्ध अशा स्थानिक कलाकारांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या मिरवणूक सोहळ्यात तसेच गांधी मैदान येथील मल्लखांबाची प्रात्यक्षिके, भक्तीगीतांचा कार्यक्रम सोहळ्यास सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ. अच्युतराव गोडबोले, कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, श्री रामदास स्वामी भक्त मंडळ चे कार्याध्यक्ष रंगराव जाधव, अध्यक्ष लक्ष्मण भंडारे, उपाध्यक्ष नारायण खरे यांनी केले आहे.