सातारा : नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. सातारा शहरात १, २ व ३ डिसेंबरला ड्राय डेमुळे मद्याची दुकाने बंद राहणार आहेत. मात्र मद्याचे प्याले बंद राहणार नाहीत. कारण दुकाने बंद राहणार असली तरी छुप्या पद्धतीने 'पार्सल' मिळत असल्याने 'ड्राय डे नावाला, पार्सल मिळतंय भावाला' असे म्हणण्याची वेळ आली आहे.
वर्षभरात स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती आदी दिवसांचे महत्त्व जपले जावे म्हणून ड्राय डे पाळला जातो. सरकारच्या वतीने तसे परिपत्रक काढले जाते. मात्र बहुतेक वेळा हा ड्राय डे कागदावरच राहतो असे पाहायला मिळते. कारण दारू दुकाने बंद असली तरी छुप्या पद्धतीने दारू उपलब्ध होतच असते. बऱ्याच ठिकाणी राजरोसपणे हा व्यवहार सुरू असलेला दिसतो. उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यंत्रणा यांना ही समांतर यंत्रणा माहीतच नसते का ? असा प्रश्न भाबड्या जनतेला पडतो.
आता नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे दारू दुकाने बंद असल्याचे पाहायला मिळाले. मात्र या दारू दुकानांच्या आसपास काहीजण 'पार्सल पाहिजे का ?' असे लोकांना विचारत असतात. ज्यांना 'पार्सल' हवे, त्यांच्यासाठी हा प्रश्न म्हणजे समाधानाचा परमोच्च बिंदू. 'या हृदयीचे त्या हृदयी' पोहोचले कसे ? याची कल्पनाच केलेली बरी. ड्राय डे मुळे मद्याची दुकाने बंद असली तरी मद्याचे प्याले भरणारच नाहीत असे अजिबात नाही. फक्त छुप्या पद्धतीने मद्याच्या कुप्या प्राप्त होणार असल्याने त्यासाठी नेहमीपेक्षा थोडी जास्त पदरमोड करावी लागते इतकेच.
या सगळ्या प्रकारामुळे ड्राय डे चा मूळ हेतू सफल होत नाही. उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यंत्रणा यांच्या गांधारीच्या भूमिकेमुळे ड्राय डे म्हणजे केवळ कागदाला कागद आणि उपचाराला उपचार होत आहे. त्यामुळे 'ड्राय डे नावाला आणि पार्सल मिळतंय भावाला' असे म्हणण्याची वेळ आली आहे.