सातारा : बचत, काटकसर आणि नेटके नियोजन याद्वारे अजिंक्यतारा साखर कारखाना प्रगतीपथावर पोहचला आहे. संस्थेची प्रगती आणि सभासद- शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साध्य झाले असून सभासद, शेतकरी आणि कामगार यांच्या अनमोल सहकार्यामुळेच कारखान्याच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला आहे. कारखान्याने गत हंगामात ऊसाला ३२०० रुपये प्रतिटन दिले असून या दिवाळीपूर्वी कारखाना व्यवस्थापन प्रतिटन आणखी १०० रुपये शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याचे तसेच कामगारांना १९ टक्के बोनस देणार असल्याचे जाहीर करून शेतकरी हित जोपासण्यात अजिंक्यतारा कारखाना कायम अग्रेसर राहील, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
दरम्यान, नेहमीप्रमाणे आगामी गळीत हंगामातही आपला सर्वच्या सर्व ऊस अजिंक्यतारा कारखान्याला घालून आपले सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. शेंद्रे, ता. सातारा येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात, मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सभेत ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व आजी, माजी संचालक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, वनिता गोरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सौ. कांचन साळुंखे, सुरेश सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कमी क्षेत्रात उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या आणि कारखान्यास विक्रमी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यकारी संचालक मोहिते यांनी सभेपुढील विषयांचे वाचन केले. सभासदांनी हात वर करून एकमताने सर्व विषयांना मंजुरी दिली.
ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मराठवाडा भागात अति पाऊस आणि पुरस्थितीमुळे उभी पिके नष्ट झाली आहेत. बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकार ठोस पावले उचलत आहे. मी पालकमंत्री असलेल्या लातूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २४४ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळाची आहे. आपल्या जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी मी पाठपुरावा करणार आहे.
सभासद, शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळेच अजिंक्यतारा कारखाना प्रगतीपथावर पोहचला आहे. कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांनी जे स्वप्न पहिले होते ते सत्यात उतरले असून हे दिवस सभासद आणि कामगारांच्या अनमोल सहकार्यामुळे दिसत आहेत हे कोणीही विसरणार नाही. येणाऱ्या उसाला उच्चतम दर देण्यासाठी योग्य ती ठोस पावले कारखाना व्यवस्थापन उचलत आहे. अजिंक्यतारा कारखाना हा तुमच्या हक्काचा कारखाना आहे. ही संस्था आणखी मोठी झाली पाहिजे आणि सभासद, ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना आणखी उच्चतम दर मिळाला पाहिजे, या साठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे आपला सर्वच्या सर्व ऊस अजिंक्यतारा कारखान्याला देऊन आगामी गळीत हंगाम यशस्वी करूया. आपल्या सर्वांचे सहकार्य नेहमीच मिळाले असून यापुढेही आपलं सहकार्य नेहमीप्रमाणे कायम ठेवा, असे आवाहन ना. शिवेंद्रसिंहराजेंनी केले.
व्हा. चेअरमन सावंत यांनी सूत्रसंचालन केले. माजी व्हा. चेअरमन विश्वास शेडगे यांनी आभार मानले. सभेला किरण साबळे- पाटील, सरिता इंदलकर, राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, दादा शेळके, लालासाहेब पवार, विक्रम पवार, रामभाऊ जगदाळे, सुनील काटे, राजेंद्र यादव, धनाजी शेडगे, रवी, कदम, चंद्रकांत घोरपडे, उत्तमराव नावडकर, अजित साळुंखे, सुरेश टिळेकर, गणपत मोहिते, गणपत शिंदे, मधुकर पवार, विजय पोतेकर, पदमसिंह फडतरे, दिलीप शेडगे, सयाजी कदम यांच्यासह विविध संस्थांचे आजी- माजी पदाधिकारी, सभासद- शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १० लाखाची मदत
अजिंक्यतारा साखर कारखाना सामाजिक बांधिलकी जोपासण्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे तसेच पूरपरिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकार ठोस भूमिका घेत आहे. राज्य सरकारच्या आवाहनानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून अजिंक्यतारा कारखान्याने १० लाख रुपये मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली असून त्याचा धनादेश कारखान्याच्या संचालक मंडळाने ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे सुपूर्तर्द केला. या मदतीबद्दल सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात कारखाना व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.