सातारा : जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास येते. या प्रकारामुळे ग्रामीण भागात रात्री-अपरात्री रुग्णालयात आलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होत असे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक राहण्यासाठी जिओ फेसिंग अटेंडन्स (युबीआय सॉफ्टवेअर) ही प्रणाली कार्यान्वित केली होती.
या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याशनी नागराजन यांच्याशी चर्चा केली. यामध्ये याशनी नागराजन यांनी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक अथवा युबीआय हजेरी बंधनकारक असून, हजेरी नसल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
आरोग्य विभागांतर्गत ग्रामीण भागातून वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी वेळेवर नियमित हजर राहण्यासाठी नागराजन यांनी आरोग्य विभागास ऑनलाइन युबीआय हजेरी देण्याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याशनी नागराजन यांच्याशी चर्चा केली. आरोग्य विभागाचे जिल्ह्यात चांगल्या प्रकारे कामकाज सुरू असून, त्यांनी कोविडच्या काळात अत्यंत चांगल्या प्रकारे काम केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले;
परंतु काही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर नसल्याने रुग्णांना नाहक त्रास होत असल्याच्या तक्रारींमुळे आरोग्य विभागाच्या बाबतीत कडक भूमिका घ्यावी लागत आहे. तथापि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांना युबीआय हजेरीबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे नागराजन यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, सर्व संघटनांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर बायोमेट्रिक मशिन संबंधित संस्थांमार्फत बसवण्याचे मान्य करत त्याबाबत लेखी पत्र दिले आहे. या पत्राच्या आधारे याशनी नागराजन यांनी बायोमेट्रिक, युबीआय हजेरीस मान्यता दिली आहे.
कागदोपत्री हजेरी चालणार नाही
प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालयातील अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर नसल्याच्या तक्रारी येतात. यापुढे बायोमेट्रिक अथवा युबीआय हजेरी बंधनकारक असून, कागदोपत्री हजेरी चालणार नाही, अशी ठाम भूमिका नागराजन यांनी घेतली आहे.