लाखो रुपये घेऊन फसवणूक करणारा आर्मी जवान अटक

चार दिवसांची पोलीस कोठडी; भरती करून देण्याचे आमिष

by Team Satara Today | published on : 21 September 2025


सातारा  : सैन्य दलात भरती करून देतो असे सांगून तब्बल 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आर्मी जवान प्रदीप विठ्ठल काळे (वय 28, रा. कोळे, ता. कराड) सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी रितेश नितीन जाधव (रा. नेले, किडगाव, ता. सातारा) यांना तसेच त्यांच्या भावाला आरोपीने आर्मीमध्ये क्लार्क पदावर भरती करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी वेळोवेळी ऑनलाइन तसेच आरटीजीएसद्वारे 3 लाख 70 हजार रुपये घेतले. परंतु, भरतीबाबत कोणतीही कारवाई न करता आरोपीने टाळाटाळ केली व शेवटी फिर्यादीचे नंबरही ब्लॉक केले. त्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद नेवसे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने पुणे येथून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.

संशयिताने यापूर्वी कराड तालुक्यातील एका युवकाचीही अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. आणखी काही युवकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. अशा फसवणुकीचे बळी ठरलेल्या युवकांनी तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि विनोद नेवसे, पोहवा संदीप आवळे, मनोज गायकवाड, पंकज ढाणे, विद्या कुंभार, राजू शिखरे, शिवाजी वायदंडे, दादा स्वामी, प्रदीप मोहिते, पोकॉ संदीप पांडव तसेच सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला.

सदर आरोपी विरुद्ध आणखी कोणाच्या तक्रारी असतील तर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा सातारा तालुका पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ध्वनी प्रदूषणाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
पुढील बातमी
रहिमतपूरच्या महाराणी जमनाबाई गायकवाड यांचा इतिहास प्रेरणादायी

संबंधित बातम्या