शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष; साताऱ्यातील आर्किटेक्टची ५७ लाखांची फसवणूक

by Team Satara Today | published on : 04 April 2026


सातारा : जास्तीचा परतावा मिळण्याच्या हव्यासापोटी साताऱ्यातील एका नामांकित आर्किटेक्टला तब्बल ५७ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विलासपूर येथील आर्किटेक्ट विनायक एकनाथ धनावडे (वय ४६) यांची 'ग्लोबिक्सवाल्ट' या वॉलेटच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंग करताना फसवणूक झाली असून, याप्रकरणी सायबर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विनायक धनावडे यांनी सोशल मीडियावर 'ग्लोबिक्सवाल्ट शेअर ट्रेडिंग'ची एक जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीमधील क्रमांकावर संपर्क साधला असता, प्रियांका शर्मा, संदीप भंडारी आणि 'मेनटॉरअंकल' नावाच्या व्यक्तींनी त्यांना अधिक माहिती देण्याच्या बहाण्याने एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील करून घेतले. या ग्रुपवर शेअर बाजार आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखवण्यात आले. संशयितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून धनावडे यांनी वेळोवेळी विविध बँक खात्यांद्वारे एकूण ५६ लाख ९९ हजार ५५० रुपये गुंतवले.

​मात्र, मोठी रक्कम गुंतवूनही बराच काळ कोणताही परतावा मिळत नसल्याने धनावडे यांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. वारंवार प्रयत्न करूनही समोरून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आणि संपर्क तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी धनावडे यांनी तातडीने सातारा सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रियांका शर्मा, संदीप भंडारी आणि मेनटॉरअंकल या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक शेवाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण: पीएसआय गोपाळ बदनेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
पुढील बातमी
दिंडोरीत कार विहिरीत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या