सातारा : विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच सातारा हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपची ताकद दाखवून देण्याची वेळ आली असून पक्षाच्या वरिष्ठांनी जिल्ह्यासाठी 6 लाख सभासद नोंदणीचे दिलेले उद्दिष्ट सगळ्यांनी मिळून पूर्ण करुया, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
सातारा येथे भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक व पक्ष सदस्यत्व अभियानाचा आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, मकरंद देशपांडे, माजी आ. मदन भोसले, डॉ. दिलीप येळगावकर, आनंदराव पाटील, किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्या सुवर्णाताई पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, चित्रलेखा माने-कदम, मनीषा पांडे, सुनिशा शहा, विकास गोसावी, जयकुमार शिंदे, अनुप सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वेळ दिला व प्रयत्न केला तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीआधी पक्षासाठी चांगली स्थिती निर्माण होईल. सभासद नोंदणीचे टार्गेट पूर्ण करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवून द्यावी.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, सभासद नोंदणीमध्ये सातारा जिल्हा हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात 1 लाख इतकी नव्याने सभासद नोंदणी झालेली आहे. येत्या 20 जानेवारीपर्यंत 6 लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट आहे. आम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करुन सन्माजनक सभासद नोंदणी करु.
सक्रिय सभासदालाच निवडणुकीचे तिकिट : ना. जयकुमार गोरे
विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्याने महायुतीला साथ दिली आहे. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत. जे सभासद भाजपचे नवीन सभासद नोंदणीसाठी सक्रियपणे काम करतील, त्यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे तिकिट दिले जाणार आहे, अशी माहिती ना. जयकुमार गोरे यांनी या बैठकीत दिली.