त्रिपुरारी पौर्णिमेच्या सायंकाळी हजारो पणत्यांनी उजळली मंदिरे; सातारा जिल्ह्यातील विविध मंदिरात दीपोत्सव साजरा

by Team Satara Today | published on : 05 November 2025


सातारा  : दरवर्षी अश्विन पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पर्यंत विविध मंदिरांमध्ये काकड आरती सोहळा संपन्न होतो. या काकड आरती सोहळ्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेच्या सायंकाळी मंदिरांमध्ये हजारो दीप लावून दीपोत्सव साजरा केला जातो.असाच दीपोत्सव आज बुधवारी सायंकाळी सातारा जिल्ह्यातील विविध मंदिरात साजरा करण्यात आला. 

सातारा शहरातील यादोगोपाळ  पेठेतील दिवशीकर बंधू यांच्या श्री मुरलीधर मंदिरात यानिमित्त विशेष विद्युत रोषणाई तसेच हजारो मेणपणत्या लावून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्रीकृष्णाला आवडणाऱ्या मोरपीस, बासरी आणि विविध रंगातील महा रांगोळीने परिसर सुशोभित करण्यात आला होता. सायंकाळी श्रीकृष्णाची महा आरती करून हा दीपोत्सव शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या दीपोत्सवा सोबतच उपस्थित भक्तांना प्रसादाचेही वितरण करण्यात आले.

सातारा शहर परिसरातील पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिरातही हजारो दीप लावून देवी भक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. तसेच सातारा शहरा नजीकच्या संगम माहुली परिसरात कृष्णा आणि वेण्णा नदीच्या काठावर शेकडो दीप प्रज्वलित करण्यात आले होते. राजवाडा परिसरातील पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिराच्या वतीने उद्या गुरुवार दि.6 नोव्हेंबर रोजी देवीचा पालखी सोहळा साजरा करण्यात येणार असून या काकड आरती सोहळ्याची सांगता होणार आहे अशी माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख व सचिव प्रशांत तुपे यांनी दिली.

सातारा शहरातील गोल मारुती मंदिर, राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेश मंदिर, तसेच कृष्णा नगर परिसरातील श्री नटराज मंदिरातही हा दीपोत्सव मोठ्या उत्साहात झाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वासोटा किल्ला प्रवेश शुल्कवाढीवर स्थानिकांचा संताप; स्थानिक व्यवसायिक व गडप्रेमींचा वन विभागाला सवाल, कोणत्या शासन निर्णयानुसार वाढ?
पुढील बातमी
मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी सुरू; जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, आधारभूत दर निश्चित

संबंधित बातम्या