‘ते पक्ष सोडणं नव्हतं, घर सोडणं होतं’; उद्धव ठाकरेंसमोर राज ठाकरे भावूक; जुन्या वेदना विसरून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा.

by Team Satara Today | published on : 23 January 2026


मुंबई : “मी ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो, तो माझ्यासाठी केवळ राजकीय निर्णय नव्हता. ते माझे स्वतःचे घर सोडण्यासारखे होते,” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनातील दोन दशकांपासूनची वेदना थेट उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावर आले होते. यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात राज ठाकरे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या २० वर्षांत काळ खूप पुढे गेल्याचे सांगत ते म्हणाले, “या दोन दशकांत मलाही अनेक गोष्टी उमजल्या आहेत आणि मला खात्री आहे की उद्धव यांनाही त्या समजल्या असतील. त्यामुळे आता जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही, जे झाले ते आता सोडून दिले पाहिजे.”

सध्याच्या राजकीय स्थितीवर राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. “आज देशात आणि महाराष्ट्रात ‘गुलामांचा बाजार’ भरला आहे. कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणी जे गलिच्छ राजकारण सुरू आहे, ते पाहून मला शिसारी आली आहे. हे सर्व पाहायला आज बाळासाहेब आपल्यात नाहीत, हेच सर्वात चांगले झाले. कारण हिंदुत्वाचा हा मांडलेला बाजार पाहून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या, तो माणूस हे सहनच करू शकला नसता,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

बाळासाहेब ठाकरे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते, असे सांगताना राज ठाकरे म्हणाले की, “हत्तीच्या गोष्टीप्रमाणे बाळासाहेब प्रत्येकाला वेगवेगळे वाटले, पण ते जगाला पूर्णपणे कधीच समजले नाहीत. त्यांच्या व्यंगचित्राच्या रेषेवर बाहेरच्या जगाचा कधीच परिणाम झाला नाही. मला भविष्यात बाळासाहेबांच्या या विविध पैलूंवर एक सविस्तर व्याख्यान द्यायला नक्कीच आवडेल.”

या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत आणि अमित ठाकरे यांचीही उपस्थिती होती. ठाकरे बंधूंनी एकत्र येत एकमेकांबद्दल सामंजस्याची भूमिका घेतल्याने भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विकसित भारतासाठी देशात एकजूट निर्माण झाली आहे - पंतप्रधान मोदी; तिरुअनंतपुरममध्ये एक भव्य रोड शो
पुढील बातमी
प्रजासत्ताक दिनी भोंदवडे येथील शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा; भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांच्याकडून अन्यायामुळे निर्णय

संबंधित बातम्या