सातारा : भाजपच्या महाराष्ट्र राज्य परिषदेवर प्रमुख नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील तब्बल दहा नेत्यांना या समितीवर घेण्यात आले आहे. राज्याची कार्यकारिणी निवडताना या नेत्यांच्या भूमिकेला महत्व राहणार आहे.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आमदार मदनदादा भोसले, सत्यजित पाटणकर, डॉ. प्रियाताई शिंदे, अविनाश कदम, भीमराव पाटील, हर्षवर्धन मोहिते, संजय पवार, संतोष गावडे अशी भाजपच्या राज्य परिषदेवर नियुक्त केलेल्या नेत्यांची नावे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच घेतल्या जाणार आहेत. या निवडणुका महायुती म्हणून लढवणार की युतीचे घटक पक्ष स्वतंत्रपणे लढणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याचा निर्णय झाला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये घटक पक्षाशी समन्वय रहावा, या उद्देशाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही राज्य परिषद नेमण्यात आली आहे. यासोबतच भाजपची राज्य कार्यकारिणी लवकरच निवडली जाणार आहे. त्यामध्ये राज्य उपाध्यक्ष, सरचिटणीस या प्रमुख पदांसह इतर पदांची नियुक्ती होणार असून त्यामध्ये राज्य परिषद सदस्यांची मते विचारात घेतली जाणार आहेत.