सातारा : सातारा शहर परिसरात विविध दोन घटनेत अल्पवयीन मुलींची छेड काढून त्यांचा विनयभंग केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मुलीची युवकाने छेड काढली आहे. तर दुसर्या घटनेत मुलीला चॉकलेट देवून तिचा वृध्दाने विनयभंग केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पहिली घटना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अल्पवयीन मुलगी कॉलेजला जात असताना तुषार (पूर्ण नाव, वय, पत्ता माहित नाही) याने मुलीचा पाठलाग केला. इन्स्टाग्रामवर त्या युवकाची मुलीसोबत ओळख आहे. जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत युवकाने मुलीचा वेळोवेळी पाठलाग केला आहे. संशयिताने ‘तू मला आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यासोबत एन्गेज हो. नाहीतर मी तुला त्रास देईन. रिलेशनशीपमध्ये राहिली नाही तर मी हाताची नस कापून घेईन,’ असे म्हणत मुलीला धमकी दिली. या सर्व घटनेने मुलगी घाबरली. तिने घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दुसरी घटना शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अल्पवयीन मुलीला चॉकलेट देवून तिला जवळ ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही घटना समोर आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलगी 6 वर्षाची असून याप्रकरणी महादेव मोहिते (वय 74, रा. शाहूपुरी) याच्या विरुध्द पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे.