मुंबई : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. महिला आयपीस अधिकारींच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.
डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलचे तापले आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या सगळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल आणि दोषींपैकी कोणालाही सोडले जाणार नाही,असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे दोन पीए, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर आरोप करण्यात आला. गोपाळ बदनेने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आपल्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव आल्याची तक्रारही तिने केली होती.
या प्रकरणात अनेक नावांचा समावेश असल्याने, त्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली होती. तसेच सातारा पोलिसांनी याची चौकशी केल्यास त्यांच्यावर दबाव राहू शकतो. त्यामुळे एसआयटी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत होती.