सातारा : सातारा तालुक्यातील शिवथर (इंगवले वस्ती, फरशी ओढा) परिसरातील डीपीतून अज्ञात चोरट्याने सुमारे २४ हजार रुपये किंमतीची तांब्याची तार चोरीस नेल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांची माहिती अशी, शिवथर येथील डीपीतील सुमारे ८० किलो वजनाची, अंदाजे २४ हजार रुपये किमतीची तांब्याची तार अज्ञात चोरट्याने महावितरण कंपनीची कोणतीही परवानगी न घेता मुद्दाम लबाडीने चोरून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ही घटना दादा जयसिंग माने यांच्या शेताशेजारी घडली.
याप्रकरणी फिर्यादी प्रविण टोणपे (वय ३६, व्यवसाय - कनिष्ठ तंत्रज्ञ, बाह्य स्त्रोत, म.रा.वि.वि. कंपनी मर्या., शाखा - वडथ, रा. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार यादव करत आहेत.