नववर्षाच्या पूर्वसंध्येपासूनच सातारा पोलिसांचा तळीरामांवर वॉच; चारभिंती, कास, ठोसेघर मार्गावर होणार कडक तपासणी

by Team Satara Today | published on : 27 December 2025


सातारा :  नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सातारा शहरातील तरुणाई अत्यंत आतुर झाली असून अनेकांनी वेळेअभावी चारभिंती, कास, ठोसेघर या ठिकाणांना पसंती दिली आहे. नववर्षाचे स्वागत म्हणजे ओली पार्टी व्हायलाच पाहिजे, असा ट्रेंड देशभरात सुरू आहे.‌ त्याला सातारा अपवाद कसा ठरेल? पिले पिले ओ मेरे राजा.... म्हणत संगीताच्या तालावर फेर धरण्याचा कार्यक्रम तरुणाईने निश्चित केला असला तरी नववर्षाच्या पूर्वसंधेपासूनच सातारा पोलिसांचा तळीरामांवर वॉच राहणार आहे. शहर परिसरात असणाऱ्या पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या चार भिंती, कास, आणि  ठोसेघर मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे.

दरवर्षी सातारकर नववर्षाचे स्वागत अत्यंत जल्लोषात करतात. अनेक जण सहकुटुंब मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या पाचगणी, महाबळेश्वर या ठिकाणांना प्राधान्य देतात मात्र नाताळापासूनच या ठिकाणांवर देशभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक नववर्षाच्या स्वागतासाठी दाखल होत असतात. अनेकदा हॉटेल, रिसॉर्ट हाउसफुल होत असल्यामुळे गर्दीच्या वेळी या ठिकाणांकडे सातारकर पाठ करत असतात. लोणावळा, माथेरान, कर्दे बीच या ठिकाणांना अनेक जण पसंती देतात मात्र सध्या पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर‌ सातत्याने खंबाटकी घाटात होणारी वाहतूक कोंडी, मुंबई- गोवा महामार्गावरही नाताळपासूनच संथ गतीने वाहतूक सुरू आहे त्यामुळे अलीकडच्या काळात सातारकर नववर्षाच्या स्वागतासाठी शहरानजीकच्या चार भिंती, कास, ठोसेघर या ठिकाणांना अधिक पसंती देऊ लागले आहेत. 

नववर्षाचे स्वागत झिंग झिंग झिंगाट, पिले पिले ओ मोरे राजा... असे म्हणत केले जाते त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच सातारा शहरातील चार भिंती, बोगदा, बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौक आणि वाढे फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. प्रत्येक खासगी वाहनाची कसून तपासणी करण्यात येणार असून मद्य प्राशन करून वाहन चालवण्यावर गुन्हे दाखल करणे, दंडाची आकारणी करणे आदी कायदेशीर कारवाया करण्यात येणार असल्यामुळे तळीरामांनी यावर्षी जरा दमानेच नववर्षाचे स्वागत करण्याची आवश्यकता आहे. 

जिल्ह्यात मद्य प्राशन करणाऱ्यांची संख्या वाढली 

मिळालेल्या माहितीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात मद्य प्राशन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यातील मद्यपिंनी  ९६ कोटी रुपयांची दारू रिचवली असल्याची माहिती प्राप्त होत आहे. थोडक्यात गतवर्षीच्या तुलनेत १७ कोटी रुपयांची यामध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

विविध हॉटेल्स, धाबे सज्ज 

सातारकारांमध्ये खाद्य संस्कृतीत फार मोठी वाढ झाली आहे. मित्रांसमवेत अथवा कुटुंबांसमवेत बाहेर जेवायला जाण्याची एक नवीन क्रेज साताऱ्यात निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे शहर व परिसरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स आणि धाबे उघडले आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स आणि धाबे चालक सज्ज झाले असून पर्यटकांना आकर्षक करण्यासाठी विविध पॅकेज तयार करण्यात आली आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा वाहतूक शाखा व पीडब्ल्यूडीची संयुक्त अतिक्रमणविरोधी धडक कारवाई; रस्त्यावर ठेवलेले साहित्य, वजन काटे आदी साहित्य जप्त
पुढील बातमी
टिका-टिपणीमुळे कोरेगाव मतदारसंघातील वातावरण ढवळले; पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्हीही शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांनी बाह्या सरसावल्या

संबंधित बातम्या