जमावबंदीचे आदेश म्हणजे प्रशासनाला 'उशिरा सुचलेलं शहाणपण' - शशिकांत शिंदे

by Team Satara Today | published on : 04 April 2026


सातारा : सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सभापती निवडीच्या वेळी लागू केलेले जमावबंदीचे आदेश म्हणजे प्रशासनाला 'उशिरा सुचलेलं शहाणपण' असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. 'बैल गेला आणि झोपा केला' अशी प्रशासनाची अवस्था झाली असून, सरकारी तिजोरीतून आमिष दाखवून निवडणुका आणि सदस्य जिंकण्याचा नवीन फंडा सुरू झाला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनाची भूमिका नेमकी काय आहे, हे तपासावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

​सभापती निवडीच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करताना शिंदे म्हणाले की, निवडीच्या वेळी सीसीटीव्ही आणि सभेचे चित्रीकरण व्यवस्थित झाले आहे का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. एका उमेदवाराने हात वर केला नसतानाही त्याचे मतदान गृहीत धरणे ही अक्षम्य चूक आणि पक्षपातीपणाचा प्रकार आहे. या सभेचे अधिकृत चित्रीकरण आणि सीसीटीव्ही फुटेजची आम्ही मागणी करत आहोत, ते न मिळाल्यास आम्ही न्यायालयात धाव घेऊ. लोकशाहीची थट्टा न होता आगामी निवडी तरी पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

​सत्ताधारी पक्षावर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की, आमच्या पक्षाचा एखादा उमेदवार भाजपकडे गेला की त्याला तात्काळ कोट्यवधी रुपयांची कामे कशी मिळतात, हा प्रश्न आहे. पैशाचा बाजार करून निवडणुका जिंकणे हे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यासाठी दुर्दैवी आहे. मात्र, जनता या सर्व गोष्टींचा विचार करत असून, सदस्यांनी कोणत्याही दबावाशिवाय निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

​खरात प्रकरणावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, गुन्हा करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, मात्र पीडित महिलेवर कारवाई करणे योग्य नाही. या प्रकरणात एसआयटीच्या तपासातून हवाला आणि सीएची नावे समोर येत आहेत. हा पैसा कायदेशीर आहे की बेकायदेशीर, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या असून उमेदवारीबाबत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल.

​राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरताना शिंदे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे बळीराजा हवालदिल झाला असताना शासन मदतीच्या बाबी लपवत आहे. केंद्र सरकारकडून २५ हजार कोटींची मदत अद्याप मिळालेली नाही आणि विमा कंपन्यांकडून वेळेवर पंचनामे होत नाहीत. सरकारने कर्जमाफीच्या बाबतीत घेतलेला निर्णय फसवा असून, जाचक अटींमुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहण्याची भीती आहे. निवडणुकीपुरते आश्वासन देऊन नंतर शेतकऱ्यांच्या पदरी निराशा टाकण्याचे काम हे सरकार करत असून, या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार पाहायला मिळेल, असा इशाराही शशिकांत शिंदे यांनी दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तमाशा कलावंतांवरील भ्याड हल्ल्याचा विद्रोही सांस्कृतिक चळवळीकडून निषेध; संरक्षणाची मागणी
पुढील बातमी
वीज कोसळून भोळेवाडीतील शेतकऱ्याचा मृत्यू

संबंधित बातम्या