संगमनगर पोलीस दूरक्षेत्र असून अडचण नसून खोळंबा

कधी बंद तर कधी सुरू; तक्रारदारांना माराव्या लागत आहेत शहर पोलीस ठाण्यात चकरा

by Team Satara Today | published on : 20 October 2025


सातारा :  सातारा शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनगर, ता. सातारा येथील पोलीस दूरक्षेत्र  कधी बंद तर कधी सुरू राहत असल्यामुळे संगमनगर, प्रतापसिंहनगरसह परिसरातील पाच गावांतील तक्रारदारांना सातारा शहर पोलीस ठाण्यात चकरा माराव्या लागत आहेत. थोडक्यात हे पोलीस ठाणे असून अडचण नसून खोळांबा असे ठरत आहे.

 सातारा शहरालगत असणाऱ्या पाच गावातील तक्रारदारांची फरफट थांबवण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाणे अंकित  हे पोलीस दूरक्षेत्र पूर्ववत क्षेत्रमाहुली येथे नव्याने सुरू करण्याची गरज या निमित्ताने उपस्थित होऊ लागली आहे. ते शक्य नसेल तर किमान प्रतिदिन सकाळी ८ ते संध्याकाळी ८ यावेळी आहे त्या ठिकाणी १२ तास पोलीस ठाणे कार्यान्वित ठेवण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

सातारा शहराच्या उपनगराला लागून संगम माहुली, क्षेत्र माहुली, सोनगाव, महागाव आणि पुनर्वसित खावली अशी पाच गावे आहेत. या पाच गावातील नागरिकांसाठी सन २००३ पूर्वी क्षेत्रमाहुली येथील बस स्थानकासमोर पोलीस ठाणे कार्यरत होते. त्यावेळी एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक त्या ठाण्यात करण्यात आली होती. त्यावेळी क्षेत्रमाहुली येथे पोलीस ठाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे परिसरातील पाच गावांतील नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होत होती. त्यानंतर क्षेत्रमाहुली येथील पोलीस ठाण्याचे संगमनगर येथे स्थलांतर करण्यात आले. जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी ओमप्रकाश गुप्ता, पोलीस अधीक्षक प्रशांत बुरडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. के. भोसले आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. जे. डी. सुपेकर यांच्या उपस्थितीत दि. १ मे २००३ रोजी सातारा शहर पोलीस स्टेशन अंकित माहुली पोलीस दुरक्षेत्राचा उद्घाटन समारंभ संगमनगर येथे झाला. 

प्रारंभी काही वर्ष या पोलीस ठाण्याचे काम अत्यंत चांगले आणि सुरळीत सुरू होते. मात्र गेल्या काही वर्षात हे पोलीस ठाणे कधी बंद तर कधी सुरू अशा अवस्थेत असल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे एखाद्याच्या विरोधात काही तक्रार असेल तर संबंधिताला अगोदर संगमनगर पोलीस ठाण्यात जावे लागते त्या ठिकाणी कागदोपत्री सोपस्कार पार पाडून पुन्हा बोलावणे आल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात जावे लागत आहे. यामध्ये अनेकांचा वेळ वाया जाण्यासह अधिकच्या प्रवासाचा खर्च सोसावा लागत आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यातील संबंधित चौकशी करणारे ज्यांच्या विरोधात तक्रार आहे, त्यांना अर्धा ते एक तास ताटकळत बसवत असल्याची हे अनेकदा निदर्शनास आले आहे. संगमनगर ही वसाहत सातारा- सोलापूर महामार्गावर असून या परिसरात किराणा स्टोअर्स, हॉटेल, परमिट रूम- बियरबार, दवाखाने, मेडिकल्स, पेट्रोल पंप, बेकरीज, एटीएम, विविध प्रकारची दुकाने, ट्रॅक्टरची शोरूम, चायनीज गाडे कार्यान्वित असून रोज संध्याकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाजी मंडई भरत असते. याच परिसरात अनेकदा चेन स्नॅचिंग, छोट्या-मोठ्या मारामारीच्या घटना घडल्याचा इतिहास आहे. एकूणच संगमनगर ही वसाहत संवेदनशील असतानाही येथील पोलीस ठाणे कधी बंद कधी सुरू अशा अवस्थेत का? असा प्रश्न परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांसह तसेच या परिसरातील पाच गावातील नागरिकांना पडत आहे.

संगमनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत क्षेत्रमाहुली परिसरासह संगममाहुली, सोनगाव, महागाव आणि पुनर्वसित खावली अशी पाच गावे आहेत.सन २००३ पूर्वी हे पोलीस ठाणे क्षेत्रमाहुली येथे कार्यरत असल्यामुळे या गावातील लोकांच्या वेळेचा आणि प्रवासाच्या पैशांमध्ये बचत होत होती. मात्र हे पोलीस ठाणे संगमनगर येथे हलविल्यानंतर अनेकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. त्यामुळे संगमनगर येथील पोलीस ठाणे किमान १२ तास कार्यान्वित ठेवावे अथवा ते पुन्हा एकदा क्षेत्रमाहुली येथे हलवावे, अशी मागणी या निमित्ताने होऊ लागली आहे.

अर्धा किलोमीटर अंतरावर दोन पोलीस दूरक्षेत्र'...

सन २००३ साली संगमनगर येथे पोलीस दूरक्षेत्र कार्यान्वित केल्यानंतर तेथून पुढे सातारच्या दिशेला असणाऱ्या बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलाखाली एका पोलीस मदत केंद्राची  उभारणी करण्यात आली आहे. याही पूल ठाण्याची संगमनगर पोलीस ठाण्यापेक्षा वेगळी अवस्था नाही. हे पोलीस ठाणे सुद्धा कधी बंद तर कधी सुरू अशा अवस्थेत पाहायला मिळते. बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रात्री ९ वाजल्यानंतर कोरेगाव, पुसेगाव, वडूज, दहिवडीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रात्री साडेदहा वाजल्यानंतर या मार्गावर एकही एसटी बस जात नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनाचाच आधार घ्यावा लागतो. या प्रवाशांमध्ये महिला प्रवाशांची ही संख्या अधिक असते मात्र येथील पोलीस ठाणेही कधी बंद तर कधी चालू अशा अवस्थेत असल्यामुळे रात्रीच्या वेळी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात वाहनांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा ही रामभरोसेच समजली जाते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खटाव आणि माण तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा ना. गोरेंकडे स्वबळाचा आग्रह; विकासकामांच्या जोरावर शतप्रतिशत विजयाचा मंत्र्यांनी दिला कानमंत्र
पुढील बातमी
घाटाई मंदिर परिसरात रानगव्यांचे दर्शन

संबंधित बातम्या