वडूज : सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत वडूज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एका आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
गणेश शामराव खरात (वय 36, रा. भांडवली, ता. माण) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात सुनील साहेबराव राऊत (वय 37, रा. वाकेश्वर) या पोलिस अंमलदारांनी दहिवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. दि. 20 मे 2017 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आरोपी गणेश खरात हा रहात असलेल्या ठिकाणी तपासासाठी दहिवडी पोलिस गेले होते. दरम्यान, आरोपी हा तेथे समोर बसलेल्या लोकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागला म्हणून यातील फिर्यादी राऊत यांनी आरोपीला शिव्या कशाला देतोस असे म्हणून गप्प राहण्यास सांगितले. परंतु, आरोपी हा शिवीगाळ करतच होता म्हणून फिर्यादी हे आरोपीस पुन्हा शिवीगाळ न देण्याबाबत समजावून सांगत असताना व शासकीय कर्तव्य पार पाडत असताना आरोपीने फिर्यादीच्या कानशिलात मारली.
याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध अति. जिल्हा व सत्र न्यायालय, वडूज येथे दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने 8 साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपीला 1 वर्ष सक्त मजुरी व 1000 रु. दंड व दंड न भरल्यास 1 महिने साधी कैद व भा.दं.वि.स. कलम 323 अन्वये 3 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.