मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. प्रचारासाठी आता काही मोजकेच दिवस राहिले आहेत. त्यामुळे कमी कालावधीत जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार प्रयत्न करत आहेत. मात्र, राज्यातील तब्बल ५५ मतदारसंघातील उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. कारण या मतदार संघतात एकाच नावाची अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. मतदारांचा या दुहेरी नावांमुळे संभ्रम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षचिन्ह व निवडणूक निशाणी निकाल ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे.
राज्यात २८८ मतदारसंघात निवडणुक होत आहे. या निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. १७ तारखेला प्रचाराची सांगता होणार आहे. राज्यातील ५५ मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेले अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करण्यात आले आहे. या माध्यमातून मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. हा प्रकार रायगडमध्ये करण्यात आला होता त्यानंतर आता राज्यातील ५५ मतदारसंघात आता हा पॅटर्न दिसून आला आहे. त्यामुळे या उमेदवारांचे भवितव्य हे पक्षचिन्ह किंवा निवडणूक निशाणी ठरवणार आहे.
दुहेरी नावाचे अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने अनेक उमेदरांची डोकेदुखी वाढणार आहे. मतदारांचा संभ्रम होऊन मतांची विभागणी होण्याची भीती उमेदवारांना आहे. त्यामुळे पक्षचिन्ह महत्वाची भूमिका बजावणार आहे. मतदारांना संभ्रम टाळण्यासाठी पक्षचिन्ह बघून बटन दाबावे लागणार आहे. एकाच नावाचे अनेक उमेदवार निवडणूक निकालावर काय परिमाण करणार हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.