तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत असलेला 'धडक २' हा सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. 'धडक'चा सिक्वेल असलेला हा सिनेमा परियेरुम पेरुमल या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. 'धडक २'मध्ये दाखवलेली तृप्ती आणि सिद्धांतची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात मराठमोळ्या आदित्य ठाकरेनेही विशेष भूमिका साकारली आहे. सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असलेल्या आदित्य ठाकरेने 'धडक २' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे.
सोशल मीडियावर कॉमेडी व्हिडीओ बनवून प्रसिद्धी मिळवेला रीलस्टार आदित्य ठाकरे थेट बॉलिवूडपर्यंत पोहोचला आहे. 'धडक २'मधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही मिनिटांच्या रीलने आदित्यला थेट बॉलिवूडच्या सिनेमात झळकण्याची संधी दिली. 'धडक २'मध्ये आदित्यने वासू ही कॉलेज स्टुडंटची भूमिका साकारली आहे. त्याने सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर आदित्यला मोठ्या पडद्यावर पाहून त्याचे चाहतेही आनंदी आहेत.
आदित्यचं फॅन फॉलोविंग तगडं आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर २ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. दॅट मराठी मुलगा नावाने त्याचं युट्यूब चॅनलही आहे. युट्यूबवर त्याचे तब्बल ५ लाख ३९ हजार इतके सबस्क्रायबर्स आहेत. आदित्यच्या रील्सला चाहत्यांची पसंती मिळते. त्याच्या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळतात. आता 'धडक २'मुळे आदित्यच्या फॅन फॉलोविंगमध्ये वाढ झाली आहे.
दरम्यान, 'धडक २' या सिनेमाचं दिग्दर्शन शाझिया इकबाल यांनी केलं आहे. १ ऑगस्टला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाने पहिल्या दिवशी ३.५ कोटींचा बिजनेस केला. 'धडक' सारखी हवा 'धडक २'ला मात्र करता आली नाही. ७ दिवसांत या सिनेमाने केवळ १६.४४ कोटींचा गल्ला जमवला आहे.