सातारा : आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही जिद्दीच्या जोरावर नागपूर येथे झालेल्या ३६ व्या वरिष्ठ राज्य तलवारबाजी स्पर्धेत एपी संघाला दुसरे स्थान मिळवून देणाऱ्या वाई तालुक्यातील बोपर्डी गावची कन्या कु. सिद्धी अभिजीत गाढवे हिचा पालकमंत्री शंभूराज देसाई,शिवसेना नेत्या डॉ ज्योती ताई वाघमारे, नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम,सातारा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे,जिल्हाप्रमुख रणजीत भोसले, उपजिल्हाप्रमुख विकास शिंदे शिवसेना सातारा शहर प्रमुख श्री. निलेश मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, सिद्धीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तीन लाख रुपये आर्थिक मदत मिळाल्याने तिला या स्पर्धेत सहभागी होता आले आणि तिने उत्कृष्ट कामगिरी केली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मदतीमुळे सिद्धीला बळ
सिद्धी गाढवे हिच्यासमोर आर्थिक अडथळे होते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आर्थिक सहकार्यामुळे तिला २६ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर येथे झालेल्या वरिष्ठ राज्य तलवारबाजी स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत सिद्धीने आपल्या एपी संघाला दुसरे स्थान मिळवून दिले.
शहर प्रमुखांकडून गौरव आणि शुभेच्छा
सिद्धीने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिवसेना सातारा शहर प्रमुख श्री. निलेश मोरे यांनी तिचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी सिद्धी गाढवे हिचा सत्कार करून तिच्या पुढील वाटचालीस मनोभावे शुभेच्छा दिल्या. श्री. निलेश मोरे म्हणाले, "आर्थिक अडचणींवर मात करून सिद्धीने राज्याच्या स्तरावर जी कामगिरी केली आहे, ती निश्चितच प्रेरणादायक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने ती यशस्वी झाली याचा आम्हाला आनंद आहे. शिवसेना सातारा शहर तिच्या पाठीशी नेहमी उभी राहील."
सिद्धी गाढवे हिच्या या यशाने बोपर्डी गावाचे तसेच सातारा जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. तिची ही कामगिरी खेळाडू आणि पालकांसाठी एक उत्तम उदाहरण आहे.