कराड : येथील प्रीतीसंगम घाटावर अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्यानंतर धार्मिक शिक्षण देणाऱ्यास बेदम मारहाण झाली. त्या घटनेनंतर रात्री शहरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालत वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोक्सो कायद्यानुसार कारी शेरखान सिराज नदाफ (वय ३५, रा. बैलबाजार रस्ता, मलकापुर) याच्यावर गुन्हा दाखल आहे. तर या मारहाणप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील प्रितीसंगमावर धार्मिक शिक्षण देणाऱ्या नदाफ याने एका अल्पवयीन मुलीला हातवारे करत तीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुलीच्या आईने तेथेच त्याला चप्पलने मारहाण केली तसेच जमावानेही मारहाण केली. त्याबाबत पिडीत मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून नदाफ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त तैनात केला. पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी जमावाला शांत केले.
दरम्यान, मारहाणप्रकरणी हरूण तांबोळी (रा. गुरूवार पेठ) यांनी शहर पोलिसात रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. त्यानुसार १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. विनायक मोहिते, श्रेयस यादव, गणेश बुरशे, रुद्र यादव, संग्राम शिंदे, शुभम पवार, आनंद चव्हाण, बंडी वाघ, बंटी याचे दोन भाचे (नावे समजू शकली नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नदाफवर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.