सातारा : राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहचणे शक्य होत नाही. यासाठी महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरीता महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचे गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर स्वतः उपस्थित राहणार आहेत तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्यासह विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, पुणे विभाग पुणे हे देखील उपस्थित राहणार आहेत.
जनसुनावणीमध्ये ३ स्वतंत्र पॅनल्स तयार करण्यात येणार असून प्रत्येक पॅनलमध्ये सदस्य म्हणून विधी व न्याय प्राधिकरणाचे वकील, संरक्षण अधिकारी, पोलीस अधिकारी, समुपदेशक, महिला व मुलांचे सहाय्य कक्ष, पोलीस अधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी यांचे समावेश करण्यात आलेला आहे. सदर पॅनल्सद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालयातील, पुणे येथे सातारा जिल्हयाच्या प्राप्त तक्रारी व इतर सेवाभावी संस्थेचे समुपदेशन केंद्र यांच्याकडील प्रकरणांचे तसेच ऐनवेळी येणाऱ्या पिडीत महिलांचे तक्रारीचे निराकरण करण्यात येणार आहे. सातारा येथे होणाऱ्या महिला जनसुनावणीस पिडीत, समस्या व तक्रारी असणाऱ्या जास्तीत जास्त महिलांनी सदर सुनावणीत सहभाग घेवून आपल्या समस्या मांडाव्यात, असेही आवाहन, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.