सोलापूर : मला रोहित पवार यांची कीव येते. मुळात ते रावणाला राम म्हणण्याचे काम करत आहेत. या सर्व प्रकरणावर रामराजेंनी बोलणं अपेक्षित आहे, त्यामुळे रोहित पवार त्यांची वकिली का करत आहेत? आजपर्यंत तुम्ही केलेल्या षडयंत्राला बळी पडून आम्ही अनेकदा दुःख सोसलं आणि भोगलं आहे. पण, संकटांच्या छताडावर उभं राहून आम्ही इथपर्यंत पोचलो आहोत. मी एवढंच सांगतो की, लवकरच आणखी काही घडामोडी घडतील. आज उन्हात आहेत, ते उद्या मांडवाखाली येतील, असा सूचक इशाराही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.
जयकुमार गोरे बदनामीप्रकरणी रामराजे नाईक निंबाळकर यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यावरून रोहित पवारांनी एक्स अकाउंटवर पोस्ट करत गोरेंवर निशाणा साधला होता. त्याला उत्तर देताना गोरे यांनी आमदार रोहित पवारांना सूचक इशारा दिला आहे. ते सोलापूर पश्चिम विभागाचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार-सावंत यांच्या पदग्रहण कार्यक्रमासाठी सांगोल्यात आल्यानंतर ते बोलत होते.
जयकुमार गोरे म्हणाले, मला रोहित पवार यांची कीव येते. मुळात ते रावणाला राम म्हणण्याचे काम करत आहेत. नाव राम असलं म्हणजे कोणी प्रभू श्रीराम होत नाही. नाव प्रभू श्रीराम आहे, काम मात्र आजपर्यंत शकुनीमामाचंच केलेले आहे. यानिमित्ताने मी सांगतो की, आम्ही कुठल्याही तपास यंत्रणेत हस्तक्षेप केलेला नाही. तपासात जे जे समारे आले आहे, त्याची चौकशी करण्यात येत आहे आणि ज्यांची चौकशी होत आहे, त्यांनीच स्पष्टीकरण द्यावं.
माझा आवाज नाही, माझा फोन झालेला नाही. मी प्लॅनमध्ये नव्हतो, मी काही केलं नाही, हे सर्व रामराजे नाईक निंबाळकर यांनी बोलणं अपेक्षित आहे. रोहित पवार हे रामराजे नाईक निंबाळकरांची वकिली का करत आहेत? कशासाठी करत आहेत?
माझं रोहित पवारांना सांगणं आहे की, आपण आपलं पाहावं. सत्तेचं मला शिकवू नका. आम्ही सत्तेच्या विरोधात संघर्ष करू उभं राहिलो आहे. आजपर्यंत तुम्ही केलेल्या षडयंत्राला बळी पडून अनेकदा आम्ही दुःख सोसलं आणि भोगलं आहे. त्या संकटांच्या छताडावर उभं राहून आम्ही इथपर्यंत पोचलो आहोत, त्यामुळे संघर्ष आणि सत्तेचं शहाणपणं आम्हाला शिकवू नका, असे खडे बोलही गोरे यांनी रोहित पवारांना सुनावले.
आपण चौकशीला सामोरे जावे, चौकशीतून सत्य बाहेर येईल. जे जे कॉल रेकॉर्ड आणि पुरावे समोर आले आहेत. त्याच्यामध्ये माझा आवाज नाही, एवढंच तुम्ही सांगा. पण, लवकरच आणखी काही घडामोडी घडतील. आज उन्हात आहेत, ते उद्या मांडवाखाली येतील. त्यामुळे रोहित पवारांनी फार सोज्वळ गप्पा मारू नये. सत्ता आहे, नाही, याच्या धमक्या आम्हाला देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या प्रकरणात संबंधित महिलेला कोणी कोणी कॉल केले, प्लॅनिंगमध्ये कोण कोण होतं. कोणी कोणत्या गोष्टी करायला सांगितल्या. हे सर्व तपासात पुढं आलेलं आहे. वेळ आल्यावर या सर्व गोष्टी उघड होतील. कोणी कितीही मोठा असला आणि तपासात दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासावर मी बोलणं योग्य होणार नाही. तपास योग्य दिशेने सुरू असून लवकरच त्यातून सत्य बाहेर येईल, असा विश्वासही जयकुमार गोरे यांनी बोलून दाखवला.
सत्तेचा आणि पदाचा गैरवापर कसा असतो, हे मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात दिसत आहे. पदाचा गैरवापर करत न्याय मागणाऱ्या पीडितेलाच जेलमध्ये टाकून आणि सत्य उजेडात आणणारे पत्रकार तुषार खरात यांना खोट्या गुन्ह्यात अडकवूनही या मंत्र्यांचं समाधान झाल्याचं दिसत नाही. म्हणूनच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांना चौकशीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. पण सत्ता ही सदासर्वकाळ नसते. आजची सत्ता उद्या जाईल, त्यावेळी आपली काय अवस्था होईल, हे आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी विसरू नये, असा इशारा रोहित पवार यांनी आपल्या एक्स काउंटच्या माध्यमातून दिला होता.