सातारा : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारपदी कोणाला संधी मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली असतानाच मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत साताऱ्यातील महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
सातारा नगरपालिकेच्या ५० जागांसाठी निवडणूक होत असून ही निवडणूक लढण्यासाठी सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी या दोन्ही आघाडीकडून मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी आपल्या मुलाखती दिल्या आहेत. नगराध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले असल्यामुळे भाजप नेते तथा सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि नगर विकास आघाडीचे नेते बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह इच्छुक नगरसेवकांच्या उमेदवारांची यादी दोन्ही राजांनी फायनल करावी, असे स्पष्ट केले आहे.
सातारा शहराच्या नगराध्यक्षपद यंदा खुले झाले आहे. त्यामुळे या पदाच्या उमेदवारीसाठी सोमनाथ उर्फ काका धुमाळ, संग्राम बर्गे, किशोर शिंदे, अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण यांच्यापासून अनेक नाव चर्चेत आहेत. यात अगदी राजघराण्यातील वृषालीराजे व वेदांतिकाराजे भोसले यांचेही नाव आघाडीवर आहे. पण या सगळ्यांना मागे टाकून भाजप नेत्या सुवर्णा पाटील यांनी थेट मुंबईतून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी लॉबिंग सुरु केल्याची चर्चा आहे. गतवेळी साताऱ्याचे नगराध्यक्षपद महिला राखीव होते. त्यामुळे आता पुन्हा महिला नको, असा सूर साताऱ्यातील राजकीय वर्तुळात आळवल्याची चर्चा सुरू आहे. असे असतानाच सुवर्णा पाटील या मुंबईत तळ ठोकून होत्या, अशी चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारपदी कोणाला संधी मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.