'संवादवारी'च्या प्रदर्शनाला फलटण येथे वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 28 June 2025


सातारा : डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व जनसंपर्क महासंचालनालयच्या 'संवादवारी'कडेही वळत आहेत.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज  पालखी सोहळ्यासोबत आयोजित  'संवादवारी' उपक्रमाअंतर्गत   प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन, कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर सुरू आहे. तरडगाव व फलटण येथे या उपक्रमाला वारकरी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

चित्ररथाचे विशेष आकर्षण :

पालखी सोहळ्यासोबत असलेला चित्ररथही वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षण आहे. अनेक ठिकाणी वारकरी चित्ररथासोबत छायाचित्र घेताना दिसत आहेत. चित्ररथावर दर्शनी भागावरील लामणदिवा, तुळशी वृंदावनाची प्रतिमा असल्याने वारीसोबत असलेल्या भाविकांची पावले चित्ररथाकडे वळतात.

चित्ररथरथाची रचना आणि त्यावर कलात्मकतेने दिलेली माहिती वारकरी बांधव कुतूहलाने पाहत आहेत. कलापथकाच्या सादरीकरणाला टाळ्या मिळत असून योजनांची माहिती व मनोरंजन अशी सांगड घातली जात आहे.

वारीसोबत चालणाऱ्या एलईडी व्हॅनवरील मोठ्या पडद्यावर दृकश्राव्य चित्रफीतीच्या माध्यमातून योजनांची माहिती दिली जात आहे. लोककला पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी भजन, विठुनामाच्या गजरासोबत रंजक पद्धतीने शासकीय योजनांची माहिती दिली जाते आणि त्यासोबत स्वच्छता आणि आरोग्याचे संदेशही देण्यात येतात. त्यामुळे या पथकासभोवतीही गर्दी दिसून येत आहे.

वारकरी आणि नागरिक प्रदर्शनाला आवर्जुन भेट देत असून योजनांची माहिती जाणून घेत आहेत. प्रदर्शनाची मांडणी आणि मिळणाऱ्या नवीन माहितीमुळे प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

प्रदर्शनास भेट देणाऱ्या वारकऱ्यांना योजनांची माहिती देणारे पत्रके वितरण करण्यात येत आहेत. या प्रदर्शनाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले आहे.

काल संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद येथे मुक्कामी होती या ठिकाणीही संवाद वारी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एसटीचा खंडाळा बसस्थानकात अपघात
पुढील बातमी
राहत्या घरी मृतावस्थेत आढळली अभिनेत्री शेफाली

संबंधित बातम्या