कोरेगाव : माझा डंपर बंद का केला?एवढ्या कारणावरून झालेल्या वादाने सोमवारी सकाळी कोरेगाव परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. शाहरूख दस्तगिर मुलाणी (रा. साप, ता. कोरेगाव) याने सहा अनोळखी व्यक्तींसह बेकायदेशीर जमाव जमवत धमकी देत शिवीगाळ करत गोंधळ घातला.
फिर्यादी कृष्णात चंद्रकांत शिंदे हे एका बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. सोमवार दि. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास ११ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव येथील गट.नं. 245 मध्ये ही घटना घडली. शिंदे यांनी फिर्यादीत नमूद केले की, शाहरूख मुलाणी व त्याच्या सोबत आलेल्या सहा अनोळखी व्यक्तींनी माझा डंपर बंद का केला ? याचा राग मनात धरून शिंदे यांना शिवीगाळ करून धमकावले. त्यांनी आर.एम. सी प्लांटचा रस्ता व वजनकाटा अडवला, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार केलीस तर तुला सोडणार नाही, अशी उघड धमकी दिली.
घटनेनंतर शिंदे यांनी तत्काळ डायल 112 वर कॉल करत पोलिसांची मदत मागितली. कोरेगाव पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. शाहरुख मुलाणी याच्यासह सहा जणांच्या विरोधक गुन्हा दाखल केला आहे. हवालदार अमोल कर्णे तपास करत आहेत.