सातारा : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 19 ते 25 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 22 मेच्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता आहे. पुणे, सांगली, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांना रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय नाशिक, कोल्हापूर, सातारा, मराठवाडा, विदर्भासह दक्षिण कोकणातही पुढील चार दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे.
२२मे सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्राची शक्यता. त्यामुळे १९-२५मे;राज्यात मोठ्या पावसाची शक्यता.कोकण,घाटात तुरळक ठिकाणी मुसळधार-अतिमुसळधार पाऊस शक्यता. १७-२०मे दरम्या कोकण,म.महाराष्ट्र, मराठवाडा तुरळक ठिकाणी मेघगर्जन, विजां,वादळी वारे,हलका-मध्यम पाऊस.
राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढला
नांदेडमध्ये सलग दोन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्री नांदेडला अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. त्यानंतर शनिवारी देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने सखल भागात पाणी साचल्याने मनपाचे पितळ उघडे पडलं आहे. नांदेड प्रमाणे कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला.
पन्हाळा, करवीर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि पन्हाळा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. शनिवारी झालेल्या पावसाने काही झाडे पडली, तर पाणी साचल्याने काही ठिकाणचे मार्ग काही-काळासाठी बंद होते. करवीर तालुक्यातील भामटे गावात डोंगरातील मुरूम माती कोसळून एका घरात घुसली. डोंगरातील माती मुरूम घसरल्याने भूस्खलनसदृश परिस्थिती निर्माण झाली. तर पन्हाळ्यातील नावली या गावात ढगफुटीसदृश पाऊस झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही मात्र साहित्याच नुकसान झालं आहे. पावसाळाच्या पार्श्वभूमीवर नागरिक देखील सतर्क होत आहेत.
जिल्ह्यात मध्यरात्री विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात, तसेच संगमेश्वर, चिपळूण, लांजामध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. जवळपास तासभर पाऊस कोसळत होता. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.