सातारा : सदरबाजार येथील सोलार कंपनीच्या कार्यालयाच्या ड्रावर मधून एक लाख 82 हजार रुपये चोरीला गेल्याची घटनाशनिवारी घडली होती मात्र सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने वेगवान तपास करून तीन तासात या चोरीचा छडा लावला.
याप्रकरणी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन ती रक्कम हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी स्वप्निल सतीश गायकवाड (रा. सदरबाजार) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दुकानातील ही रक्कम नजर चुकवून करण्यात आली होती. त्यामुळे फिर्यादी गायकवाड यांनी सातारा शहर पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधला. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तात्काळ पाचारण केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी जाऊन संबंधित जागेची पाहणी केली. तसेच या संदर्भातील काही सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात त्यांना यश मिळाले. तेव्हा या फर्मच्या कार्यालयापासून काही अंतरावर असणाऱ्या एका झोपडपट्टीतील मुलांनी ही रक्कम चोरल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी तात्काळ हालचाल करून या मुलांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून एक लाख 82 हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रियेनंतर ही रक्कम मूळ फिर्यादीला परत देण्यात आली आहे.