सातारा : सोयीस्कर ग्रामपंचायतीचा चार्ज देण्यासाठी गटविकास अधिकार्यांकडे शिफारस करण्यासाठी दहा हजार रुपये आणि प्रोटोकॉल म्हणून दरमहा पाच हजार रुपयांची मागणी महाबळेश्वर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी सुशील संभाजी पारठे (वय 50) यांनी तक्रादाराकडे केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने सोमवारी (दि. 24) तक्रार दिली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. 26) सापळा रचून, सुनील पारठे याला 15 हजार रुपये आणि आपले सरकार सेवा केंद्राचा तालुका व्यवस्थापक ओमकार संतोष जाधव (वय 27) याला दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
याबाबत माहिती अशी, तक्रारदाराने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. 26) पडताळणी केली. सुनील संभाजी पारठे याने तक्रारदाराला सोनाट ग्रामपंचायतीचा चार्ज देण्यासाठी गटविकास अधिकार्यांना शिफारस करतो, असे सांगून दहा रुपये रुपये आणि प्रोटोकॉलच्या नावाखाली दरमहा पाच रुपये लाचेची मागणी केली. ओमकार जाधव याने ग्रामपंचायतीचे दफ्तर, जमा-खर्च किर्द, ग्रामपंचायत विभागाच्या पोर्टलवर ऑनलाइन क्लोजिंगसाठी दीड हजार रुपये लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुप्रिया गावडे, हवालदार नितीन गोगावले, नीलेश राजपुरे, नीलेश चव्हाण, अजयराज देशमुख यांच्या पथकाने सापळा रचून, पारठे व ओमकार जाधव यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. संशयितांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.