सातारा : वन्यजीव संवर्धन आणि माळरान परिसंस्थेच्या रक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील किरकसाल गावाने राज्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. वाघ आणि बिबट्यांच्या गणनेच्या धर्तीवर, फेब्रुवारी २०२६ मध्ये गावाने शास्त्रीय पद्धतीने पट्टेरी तरसांची (Striped Hyena) गणना पूर्ण केली असून, असा उपक्रम राबवणारे हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे.
राज्यात वाघांची गणना नियमित होते, मात्र दुर्लक्षित असलेल्या तरसांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. हे ओळखून गावातील तरुणांनी आधुनिक 'कॅमेरा ट्रॅपिंग' तंत्रज्ञानाचा वापर केला. यासाठी परिसरात एकूण १२ कॅमेरा ट्रॅप्स बसवण्यात आले होते. वाघांच्या अंगावरील पट्ट्यांप्रमाणेच तरसांच्या अंगावरील पट्टेरी रचनाही प्रत्येक प्राण्यानुसार वेगळी असते. याच रचनेचा आधार घेऊन ७ स्वतंत्र तरसांची ओळख पटवण्यात आली असून त्यांना विशिष्ट सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत.
हा प्रकल्प डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया (WWF India), सातारा वन विभाग आणि किरकसाल जैवविविधता व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला. चिन्मय सावंत आणि त्यांच्या टीमने या मोहिमेचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे, एकेकाळी शिकारीसाठी ओळखले जाणारे काही स्थानिक लोक आता स्वतः 'वन्यजीवरक्षक' म्हणून काम करत आहेत.
जैवविविधता वारसा स्थळाकडे वाटचाल
पाणी उपलब्धता: २०१२ पासून राबवलेल्या जलसंधारण कामांमुळे शुष्क माळरानावर आता बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे, परिणामी वन्यजीवांचा वावर वाढला. पीबीआर नोंदणी: गावाने स्वतःची ‘लोक जैवविविधता नोंदवही’ (PBR) तयार केली असून, त्यात प्रत्येक झाडाची आणि प्राण्याची माहिती संकलित आहे.
वारसा स्थळ: ग्रामस्थांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे किरकसालला 'जैवविविधता वारसा स्थळ' घोषित करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. माण सारख्या दुष्काळी पट्ट्यातील एका छोट्या गावाने निसर्ग संवर्धनासाठी उचललेले हे पाऊल आज जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.