कराड : जुन्या भांडणाच्या रागातून गुप्तीने भोकसून मित्रानेच मित्राचा खून केला. मलकापूर, ता. कराड येथील व्यंकटेश गृहनिर्माण सोसायटीमध्ये असणार्या न्यू रिलॅक्स बारच्या पार्कींगमध्ये शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदर्शन ऊर्फ राजू हणमंत चोरगे (वय 26, रा. पोळ वस्ती, आगाशिवनगर, मुळ रा. गलमेवाडी, ता. पाटण) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य पांडूरंग देसाई (वय 21, रा. कोल्हापूर नाका, कराड) याला पोलिसांनी अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील व्यंकटेश गृहनिर्माण सोसायटीमध्ये रिलॅक्स बार असून शनिवारी रात्री आदित्य देसाई व सुदर्शन चोरगे हे दोघे आपल्या मित्रांसोबत त्याठिकाणी दारू पिण्यासाठी गेले होते. दारू पिताना आदित्य देसाई आणि सुदर्शन चोरगे यांच्यात शाब्दिक वाद झाला. दारू पिऊन सर्वजण बार परिसरातील व्यंकटेश सोसायटी जागेत आल्यानंतर पुन्हा वाद होऊन अचानकपणे आदित्य देसाई याने सुदर्शनच्या पोटावर गुप्तीने वार केले. त्यानंतरही काहीवेळ आदित्य, सुदर्शन हे आपल्या मित्रांसोबत तेथेच गोंधळ घालत होते. सुदर्शन जमिनीवर पडल्यानंतर त्याला उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संशयीताला ताब्यात घेवून अटक केले. याबाबत मृत सुदर्शन ऊर्फ राजू याची बहीण प्रियदर्शनी हणमंत चोरगे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य देसाई याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. एस. तारू तपास करीत आहेत.