कराड : रानडुकरांची तस्करी करणारी नऊ जणांची टोळी वन विभागाच्या पथकाने जेरबंद केली आहे. कराड तालुक्यातील कासारशिरंबे-बेलवडे रस्त्यावर मंगळवारी (दि. 11) पहाटे 5 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संशयितांनी बीडमधून आणलेल्या सात रानडुकरांची सुटका करण्यात आली. त्यांच्याकडून वाघर, शिकारीचे साहित्य व वाहन जप्त करण्यात आले आहे.
सोमनाथ बबन आडके, अमोल मारूती माने, सचिन हणमंत क्षीरसागर, सागर तानाजी यलमारे, अमित संजय आडके (रा. कासारशिरंबे, ता. कराड), गणेश नामदेव नंदीवाले (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ), योगेश रघुनाथ कुंभार (रा. मानकापूर, ता. चिकोडी), अमोल गुंडाजी नंदीवाले (रा. कोथळे, ता. शिरोळ) आणि दत्तात्रय धोंडीराम ढोणे (रा. पलूस, ता. पलूस) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी, कासारशिरंबे-बेलवडे रस्त्यावर मंगळवारी पहाटे वन विभागाचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी काही जण रानडुकरांची तस्करी करणार असल्याची माहिती मिळाली. या पथकाने सापळा रचून, एक वाहन अडवले. त्या वाहनात सात जिवंत रानडुकरे, शिकारीसाठी आवश्यक असलेली वाघर, गॅस, तीन शिकारी पाळीव कुत्री आढळली. या पथकाने ते वाहन ताब्यात घेऊन, रानडुकरांची सुटका केली. संशयितांना ताब्यात घेऊन, चौकशी केली असता, राजेगाव व गव्हाणधडी (ता. माजलगाव, जि. बीड) या गावांमधून रानडुकरे पकडून आणल्याची माहिती त्यांनी दिली. या संशयितांना अटक करून, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर हजर केले असता, त्यांना चार दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली.
उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, वनपाल दिलीप कांबळे, आनंद जगताप, दशरथ चिट्टे, अभिनंदन सावंत, कविता रासवे, रेस्क्यू टिममधील अजय महाडिक, रोहित कुलकर्णी यांनी ही कारवाई केली.