बहारदार कलाविष्काराने औंध संगीत महोत्सवाची सांगता; हजारो रसिकांची उपस्थिती; विद्वत्तापूर्ण गायकीला दाद

by Team Satara Today | published on : 12 October 2025


औंध : शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित 85 व्या औंध संगीत महोत्सवाताची सांगता नृत्यांगना अनन्या गोवित्रीकर यांचे कथ्थक नृत्य, पद्मश्री पं. उल्हास कशाळकर, पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे बहारदार आणि पं. सुरेश तळवलकर यांच्या सुरेख तबलावादनाने झाली. यावेळी हजारो रसिक श्रोते उपस्थित होते.

ज्येष्ठ गायक पं. अरुण कशाळकर यांनी धनश्री रागातील विलंबित तीनताल, जोड तीनताल आणि तराणा सादर केला. त्यांच्या विद्वत्तापूर्ण गायकीला रसिकांनी आदरपूर्वक दाद दिली. पं. कशाळकर यांना संजय देशपांडे यांनी तबल्यावर आणि प्रवीण कासलीकर यांनी संवादिनीवर संगत केली. त्यानंतर नृत्यांगना अनन्या गोवित्रीकर यांनी आपल्या कथ्थक नृत्याची सुरुवात गणेश स्तवनाने केली. त्यानंतर ताल धमार आणि कृष्णाने अक्रुराबरोबर गोकुळ सोडण्याच्या वेळेच्या शोकाकुल दृश्याच्या सादरीकरणाने आपल्या नृत्यातील ताल अंग आणि भाव अंग यातील नैपुण्याचे दर्शन घडवले.

महोत्सवाच्या शेवटचे सत्र रात्री 10 च्या सुमारास सुरू झाले. महोत्सवाचे आकर्षण ठरलेल्या पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांचे मंचावर आगमन झाले. साथीला तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि संवादिनीवर पं. सुधीर नायक असा कलेचा त्रिवेणी संगम मंचावर झाला. पं. उल्हास कशाळकर यांनी राग जयजयवंतीने गायनास आरंभ केला. तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पखवाज वादनाचे धडे गिरवत असलेल्या पार्थ भूमकर आणि रोहित खवले या तरुणांनी त्यानंतर पखवाज सहवादन केले. वादनाची सुरुवाती त्यांनी ताल चौतालने केली. त्यांना स्वानंद राजोपाध्ये यांनी लहरा साथ केली.

शनिवारी सकाळी सुरू झालेल्या या अविस्मरणीय महोत्सवाचे अंतिम सत्र रात्री 1.30 च्या सुमारास सुरू झाले. महोत्सवाची सांगता विख्यात गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाने झाली. त्यांना तबल्यावर स्वप्निल भिसे आणि संवादिनीवर चिन्मय कोल्हटकर यांनी साथ केली. पं मेवुंडी यांनी आपल्या मैफिलीचा आरंभ राग दरबारीने केला. विलंबित एकतालातील बडा ख्याल आणि त्यानंतर तीनताल आणि द्रुत एकतालात दोन बंदिशी सादर केल्या. त्यानंतर त्यांनी शिव अभोगी रागातील श्री राम जन्मानिमित्त स्वरचित बंदिश सादर केली. त्यांनी सोहोनी रागाच्या ‘रंग ना डारो श्यामजी’ आणि ‘लेना ही लेन’ हा विठ्ठल अभंग आणि विठ्ठल गजराने वातावरण भारून टाकले. मैफिलीची सांगता त्यांनी ‘जो भजे हरी को सदा’ या भैरवीन केली. महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या विश्वस्त विदुषी अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी व पं. अरुण कशाळकर यांनी परिश्रम घेतले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत महामार्ग ओलांडताना कारच्या धडकेत पादचारी ठार
पुढील बातमी
आ. मनोज घोरपडे यांची आर्याच्या कुटूंबास भेट; आर्याला न्याय मिळण्यासाठी सासपडे गावात कँडल मार्च

संबंधित बातम्या