कराडात व्यावसायिक गरबा, दांडियाला विरोध; सकल हिंदू समाज आक्रमक

महिला सुरक्षेचा प्रश्न, संस्कृतीच्या विकृतीकरणाचा आरोप

by Team Satara Today | published on : 15 September 2025


कराड, दि. १५  : नवरात्रोत्सव हा माता दुर्गेचा भक्तिभावाने साजरा होणारा पवित्र उत्सव आहे. या काळात व्यावसायिक स्वरूपात आयोजित होणाऱ्या दांडिया-गरबा कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणी कराडमधील सकल हिंदू समाजाने केली आहे. अशा कार्यक्रमांमुळे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतो. तसेच हिंदू संस्कृतीचे विकृतीकरण होत असल्याचा आरोप करत असे कार्यक्रम झाल्यास तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा समाजाने प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

सकल हिंदू समाजाच्यावतीने सोमवारी पोलीस प्रशासनाला यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. निवेदनावर अनेक समाजबांधवांची नावे आहेत. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत समाजाने आपली भूमिका स्पष्ट केली. 

यावेळी समाजबांधवांनी सांगितले की, नवरात्रोत्सव हा भक्तिभाव, भजन-कीर्तन आणि पारंपरिक दांडियांचा उत्सव आहे. परंतु, कराड शहर व परिसरातील काही हॉटेल्स, लॉन्स आणि इव्हेंट कंपन्या व्यावसायिक फायद्यासाठी तथाकथित “डिस्को गरबा” आयोजित करत असल्याचे निदर्शनास येते. यामुळे महिलांच्या सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण होतो. तसेच चुकीच्या प्रवृत्तींना खतपाणी मिळते. उत्सवाचे पावित्र्य कलंकित होते. नवरात्राचे पावित्र्य नष्ट करून समाजासमोर चुकीचा संदेश दिला जात आहे. यामुळे महिलांचा सन्मान धोक्यात येतो आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जातात. अशा कार्यक्रमांना परवानगी दिल्यास तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल.

यावेळी समाजाने प्रशासनाकडे कराड शहर व परिसरात व्यावसायिक दांडिया-गरबा कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, अशा कार्यक्रमांचे आयोजन झाल्यास आयोजकांवर कठोर कारवाई करावी, उत्सव काळात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे कार्यक्रम संबंधित समाजापुरते मर्यादित राहावेत; अन्य धर्मीयांना प्रवेश नाकारावा, हॉटेल, लॉन व कॅफे मालकांनी आपली ठिकाणे अशा व्यावसायिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देऊ नयेत, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

- चौकट

नवरात्रोत्सवात प्रशासनाने सहकार्य करावे!

दरम्यान, गणेशोत्सव काळात प्रशासनाचे उत्कृष्ट नियोजन व देखावे आणि विसर्जन मिरवणुकांसाठी केलेल्या सहकार्याबद्दल समाजाने कृतज्ञता व्यक्त केली. त्याच धर्तीवर नवरात्रोत्सवातही प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे. तसेच, स्पीकर परवाने नियमानुसार द्यावेत व दसऱ्यानंतर दोन दिवस विसर्जनासाठी मुभा द्यावी, अशीही मागणी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील वाढे येथे ब्रिटिश कालीन पुलाची दुरावस्था
पुढील बातमी
आईचा खून केल्याप्रकरणी मोराळे येथील आरोपीस जन्मठेप

संबंधित बातम्या