सातारा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना शासकीय सेवेत सामावून घ्या, महागाईप्रमाणे मानधनात भरीव वाढ करावी, आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही झाली. दरम्यान, संघटनेच्यावतीने महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा या मागणीसाठी ९ जुलै रोजी देशव्यापी संप करण्यात आला. तर गुरूवारी मागणी दिनानिमित्त अंगणवाडी सेविका आणि मतदनीस विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रभर आंदोलन करत आहेत. सातारा जिल्हा परिषदेसमोरही निदर्शने करण्यात आली. सेविका आणि मदतनीसांच्या मागण्या आहेत. त्या मान्य कराव्यात. अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन कामाचे प्रशिक्षण द्यावे, एफआरएसच्या कामातील अडचणी दूर कराव्यात, बीएलओच्या कामाची सक्ती करू नये, अंगणवाडी सेविका भरती तारीख निश्चित करावी, मदतनीसांची लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची रक्कम त्वरित द्यावी, मातृ वंदना योजनेच्या कामाची सक्ती करू नये. अंगणवाडीची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवावी, सुपरवायझरने सेविकांशी सौजन्याने वागावे, थकीत प्रवास भत्ता बिले दिले त्वरित मिळावीत, अशा आमच्या मागण्या आहेत.
या आंदोलनात कॉ. आनंदी उघडे, प्रतिभा भोसले, मालन गुरव, उज्वला मुळीक, शितल इनामदार आदींसह सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.