शिरवळ, दि. १६ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील शासकीय विश्रामगृह समोर असणाऱ्या मेनरोडवर पूर्ववैमनस्यातून भरदिवसा एका 40 वर्षीय युवकावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख (वय 40, रा. व्हाईट हाऊस, बाजारपेठ, शिरवळ, ता.खंडाळा) असे गोळीबारात किरकोळ जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर दुचाकीवरून पलायन केले आहे. ही घटना मंगळवार दि.16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.12 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शिरवळ येथील रियाज उर्फ मिन्या शेख हा शिरवळ येथे बाजारपेठ याठिकाणी कुटुंबियांसमवेत राहतो. रियाज उर्फ मिन्या शेख हा मंगळवार दि.16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान मेनरोडवर असणाऱ्या शासकीय विश्रामगृह याठिकाणी दुचाकी (क्रं एमएच-12-टीई-4498) वरून उतरत एका मित्राशी बोलत असताना सायंकाळी 5.12 वाजण्याच्या दरम्यान बाजारपेठमधून दुचाकीवरून आलेल्या दोन युवकापैकी एका युवकाने मिन्या उर्फ रियाज शेख यांच्या दिशेने येत अचानकपणे गोळीबार केला.
यावेळी मिन्या उर्फ रियाज शेख याने पाहिल्यानंतर हल्लेखोर युवकाबरोबर झटापट झाल्याने रियाज उर्फ मिन्या शेख याच्या उजव्या हाताला गोळी लागून जखमी झाल्यानंतर मिन्या उर्फ रियाज शेख याने घटनास्थळावरून पलायन केले. यावेळी हल्लेखोर युवकाने मिन्या उर्फ रियाज शेख याचा काही अंतरावर पाठलाग केला करत त्याच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी गोळीबारा नंतर दुचाकीवरून पलायन केले आहे.
यावेळी या घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर, शिरवळ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्यासह शिरवळ पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी व फॉरेन्सिक टीमने धाव घेतली. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
अन शाळकरी मुली वाचल्या..! : शिरवळ येथे युवकावर गोळीबार होत असताना सायंकाळी विद्यार्थी घटनास्थळावरून जात होते. दरम्यान, अचानकपणे घडलेल्या घटनेमध्ये जर चुकून शालेय विद्यार्थ्याला गोळी लागली असती तर असा प्रश्न निर्माण होत असून विविध चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी म्हणण्याची वेळ सध्या शिरवळकर नागरिकांवर आली आहे.
हल्लेखोर निष्पन्न : रवळ येथे युवकावर गोळीबार झाल्यानंतर खळबळ उडाली असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने शिरवळ पोलीसांनी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यादृष्टीने तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी व यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे ?यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहे.