नगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात ६३ गुन्हेगार हद्दपार; कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिस ॲक्शन मोडवर

by Team Satara Today | published on : 25 November 2025


सातारा :  सातारा शहरात आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या नगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, कोणताही तणाव, गोंधळ किंवा गुन्हेगारीला वाव मिळू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभाग कडक पावले उचलत ॲक्शन मोडवर आले आहेत. निवडणूक काळ संवेदनशील मानून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कठोर कारवाई करत एकूण ६३ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

पोलिसांच्या तपासात मारामारी, धमकी देणे, जबरी वसुली, मालमत्तेचे नुकसान, तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या संशयितांना निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून काही कालावधीसाठी जिल्ह्याबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय, संशयित गुन्हेगार, बेकायदेशीर कृत्यांत गुंतलेले लोक, तसेच निवडणुकीत अस्थिरता निर्माण करण्याची शक्यता असलेल्या अनेक व्यक्तींना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात येऊन गस्त वाढविण्यात आली आहे.


पोलिसांनी जाहीर केले आहे की, निवडणुकीदरम्यान वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही आणि कायदा मोडणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी; दि. १० डिसेंबर २०२५ रोजी मुलाखती
पुढील बातमी
स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी भाजपला साथ द्या: भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते, पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

संबंधित बातम्या