सातारा : आकाशवाणी माजगावकर माळ झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन ग्रामीण भागातील अतिक्रमण धारकांना लागू असणाऱ्या शासन निर्णयानुसार करण्यात यावे, अशी मागणी आकाशवाणी माजगावकर माळ झोपडपट्टी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात नगराध्यक्ष अमोल मोहिते व प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका अर्चना सचिन कांबळे यांच्यासोबत झोपडपट्टी कृती समितीचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. भारत पाटणकर व सहकाऱ्यांची तोंडी चर्चा झाली होती. त्या चर्चेनुसार नगरपरिषदेकडून अतिक्रमण केलेली जागा सोडण्याच्या बदल्यात प्रत्येकी ५०० स्क्वेअर फूट मोकळी जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
मात्र, समितीच्या मते संबंधित शासननिर्णयानुसार ५०० स्क्वेअर फूट जागा कोणतेही मूल्य न घेता अतिक्रमण धारकांच्या नावावर करण्याची तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांना सध्याच्या जागेवरून उठविण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. नवीन जागा देण्यासाठी विद्यमान घरे पाडावी लागल्यास घरबांधणी व स्थलांतराचा अतिरिक्त आर्थिक भार नागरिकांवर पडणार असल्याचेही समितीने स्पष्ट केले आहे.
झोपडपट्टी अतिक्रमण धारकांच्या सर्वसाधारण सभेत याबाबत सविस्तर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आला असून, नगरपरिषद प्रशासनाने या प्रस्तावाबाबत आपली स्पष्ट व लेखी भूमिका मांडावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्या आधारे पुढील चर्चा करण्याची भूमिका समितीने घेतली आहे.
आकाशवाणी माजगावकर माळ झोपडपट्टी कृती समितीच्या वतीने प्रशासनाने लवकरात लवकर यासंदर्भात सविस्तर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.