सातारा : अजंठा चौक, सातारा येथील फळांच्या दुकानास आग लागली. ही घटना दि. २१ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता घडली. या आगीमध्ये सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नसले तरी अज्ञाताविरुध्द याबाबत आयुब फकीर महंमद बागवान यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजंठा चौक येथे आयुब फकीर महंमद बागवान (वय ५५ रा. संभाजीनगर ता. सातारा) हे गेल्या दहा वर्षापासून फळांचा व्यवसाय करत आहेत. या व्यवसायात त्यांची तीन मुलेही मदत करत असतात. सुर्यनारायण उपवास विचारात घेवून फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी करुन दुकानात ठेवले होते. बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान दुकान बंद करुन घरी गेले. तोपर्यंत काही वेळातच या दुकानाला भीषण आग लागल्याचे समजले.
पुन्हा ते फळांच्या दुकानाच्या ठिकाणी येईपर्यंत संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. दरम्यान, स्थानिकांनी नजिकच्या ठिकाणाहून एक पाण्याचा टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याचवेळी अग्निशामन दलाची गाडीही आल्यामुळे ही आग तात्काळ विझवण्यात आली. या आगीत गल्लयातील दीड ते दोन हजार रुपये व फळांचे गाडे आगीत भस्मसात झाले आहेत. याबाबतचा अधिक तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.